

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देतो; पण मेंदूच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. वाढता ताणतणाव आणि व्यस्त जीवनशैलीमुळे मेंदू अकाली थकतो किंवा ‘वृद्ध’ होऊ लागतो. मात्र, महागड्या उपचारांशिवाय केवळ जीवनशैलीत छोटे बदल करून तुम्ही तुमचा मेंदू दीर्घकाळ कार्यक्षम आणि तरुण ठेवू शकता, असे तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी खालील 4 सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत :
पुरेशी आणि शांत झोप
झोप केवळ थकवा घालवण्यासाठी नसते, तर ती मेंदूच्या ‘दुरुस्ती’चे काम करते. जेव्हा आपण 7 ते 8 तासांची गाढ झोप घेतो, तेव्हा मेंदू दिवसभरातील माहितीची साठवणूक करतो आणि घातक विषारी घटक बाहेर टाकतो. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते आणि विचार करण्याची क्षमता सुधारते.
सकारात्मक विचार
आपल्या विचारांचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. सकारात्मक विचार करणार्या लोकांमध्ये ‘स्ट्रेस’ कमी असतो आणि त्यांचा मेंदू अधिक सक्रिय असतो. छोट्या गोष्टींत आनंद शोधणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि भविष्याबद्दल आशावादी राहणे या सवयी मेंदूला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात.
ताणतणावाचे नियोजन
सततचा मानसिक ताण हा मेंदूचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे विसरभोळेपणा वाढतो आणि मानसिक थकवा जाणवतो. ताण कमी करण्यासाठी दररोज ध्यान, योग, दीर्घ श्वसनाचे व्यायाम किंवा आपल्या आवडीचा छंद जोपासणे आवश्यक आहे. तणाव कमी झाला की मेंदूची कार्यक्षमता आपोआप वाढते.
सामाजिक नातेसंबंध
मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने केवळ भावनिक आधार मिळत नाही, तर मेंदूही सक्रिय राहतो. एकमेकांशी संवाद साधणे, मनमोकळेपणे हसणे आणि विचार शेअर केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. याउलट, एकटेपणाची भावना मेंदूला वेगाने कमकुवत किंवा म्हातारे बनवू शकते.