बीजिंग : सध्याच्या ‘रोबोट युगा’मध्ये काय काय घडेल, हे काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी कामाच्या ताणामुळे एका रोबोटने चक्क ‘आत्महत्या’ केल्याचे वृत्त आले होते. आता चीनच्या शांघायमधील एका रोबोटिक्स कंपनीच्या शो-रूममध्ये घडलेल्या विचित्र घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एर्बाई नावाच्या एका मिनी रोबोटने चक्क 12 मोठ्या रोबोट्सचे ‘अपहरण’ केल्याचे दिसते आहे.
हा मिनी रोबोट, जो हांगझोऊच्या एका कंपनीने विकसित केला आहे, तो या शो-रूममध्ये पोहोचतो आणि मोठ्या रोबोट्सशी संवाद साधू लागतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एर्बाईने या रोबोट्सना त्यांच्या नेहमीच्या कामांपासून दूर जाण्यासाठी फितवतो. व्हिडीओतील संवादानुसार, एका रोबोटने आपल्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘मला कधीच सुट्टी मिळत नाही’, असा त्याचा संवाद होता. यावर एर्बाईने उत्तर दिले, ‘चल मग माझ्याबरोबर ये.’ त्यानंतर एर्बाईने इतर रोबोट्सना आपल्या बरोबर घेऊन जातो. शांघायमधील कंपनीने ही घटना खरी असल्याचे सांगितले असून, हांगझोऊमधील कंपनीनेही हे मान्य केले आहे की, एर्बाई त्यांच्या कंपनीचा रोबोट आहे. हा प्रकार एका चाचणीचा भाग होता, असे त्यांनी स्पष्ट केले. हांगझोऊ कंपनीच्या प्रवक्त्यांच्या मते, एर्बाईने मोठ्या रोबोट्सच्या ऑपरेटिंग सिस्टीममधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीचा फायदा घेतला. त्यामुळे मोठे रोबोट्स त्याच्या नियंत्रणाखाली आले. या घटनेमुळे रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील असलेल्या सुरक्षेच्या धोक्यांवर प्रकाश पडला आहे. अद्याप अशा प्रकारची घटना अभूतपूर्व मानली जाते. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी ही फसवणूक असल्याचे म्हटले; पण दोन्ही कंपन्यांनी त्याच्या प्रामाणिकतेची पुष्टी केली आहे. ही घटना रोबोटिक्स जगतात एक चर्चेचा विषय बनली आहे.