Space Particles | अवकाशातून दररोज होतोय कणांचा मारा

Space Particles |
Space Particles | अवकाशातून दररोज होतोय कणांचा मारा
Published on
Updated on

वॉशिंग्टन : दर सेकंदाला पृथ्वीवर अवकाशातून सूक्ष्म कणांचा सतत वर्षाव होत असतो. यातील काही कण आपल्या पृथ्वीच्या वातावरणाद्वारे अडवले जातात आणि वातावरणातच इतर दुय्यम कणांचा शिडकाव करतात. तर काही कण मात्र वातावरण भेदून आपल्या शरीरासह कोणत्याही वस्तू पार करून सहज निघून जातात. हे कण आपल्या शरीरातून जात असल्याचे आपल्याला जाणवतही नाही; पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, नेमके किती कॉस्मिक कण कोणत्याही क्षणी आपल्या शरीरातून प्रवास करत असतील?

आपल्या शरीरातून प्रवास करणारे सर्वात सामान्य कण म्हणजे ‘न्यूट्रिनो’. युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडाचे (लास वेगास) भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मायकेल प्राविका यांच्या मते, ‘‘दर सेकंदाला आपल्या प्रत्येकाच्या शरीरातून तब्बल १०० ट्रिलियन न्यूट्रिनो पार होतात.’’ न्यूट्रिनो सामान्य द्रव्याशी अगदी नगण्य संवाद साधतात. त्यामुळे यातील बहुतांश कण आपल्या शरीराला किंवा पृथ्वीला कोणताही त्रास न देता, कोणतीही खूण न सोडता आरपार निघून जातात. प्राविका पुढे म्हणतात, ‘‘हे बहुसंख्य कण आपल्याशी कोणताही संवाद साधत नाहीत, यावरूनच हे स्पष्ट होते की आपल्या अस्तित्वामागे एक असेही वास्तव आहे ज्याची आपल्याला जाणीवही नसते.’’

न्यूट्रिनोची निर्मिती ही प्रामुख्याने अणू ऊर्जेच्या किंवा अणुकेंद्री प्रक्रियेतून होते. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनच्या भौतिकशास्त्राच्या सहायक प्राध्यापक लू लू यांच्या मते, आपल्या शरीरातून जाणाऱ्या न्यूट्रिनोपैकी बहुतांश कण हे सूर्याच्या ‘न्यूक्लियर फ्युजन’ (अणुकेंद्रकीय संमीलन) प्रक्रियेतून निर्माण होतात. काही मोजके न्यूट्रिनो इतर आकाशगंगांसारख्या अत्यंत लांबच्या अंतरावरून येतात. अवकाशातून पृथ्वीवर धडकणारे इतर कण म्हणजे ‘कॉस्मिक किरण’. हे विद्युतभारित आणि प्रचंड ऊर्जा असलेले कण असतात, जे प्रकाशाच्या वेगाने सर्व दिशांनी प्रवास करतात. सूर्याच्या प्रक्रियेतून कमी ऊर्जेचे कॉस्मिक किरण तयार होत असले, तरी बहुसंख्य कॉस्मिक किरण हे आपल्या सौरमालेच्या पलीकडून येतात.

दूरच्या ताऱ्यांचा ‘सुपरनोव्हा’ म्हणून झालेला स्फोट, अतिप्रचंड ‘ब्लॅक होल’मध्ये (कृष्णविवर) पदार्थ खेचले जाणे किंवा दोन आकाशगंगांची झालेली धडक यांमुळे हे किरण तयार होतात. कॉस्मिक किरणांमध्ये प्रामुख्याने प्रोटॉन (हायड्रोजनचे केंद्रक) किंवा हेलियम व लोहासारख्या जड घटकांचे अणुकेंद्रक असतात. याशिवाय इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉनचाही यात लहान वाटा असतो. जेव्हा हे कॉस्मिक किरण पृथ्वीच्या जवळ येतात, तेव्हा ते वातावरणातील हवेच्या रेणूंशी धडकतात आणि अडवले जातात. मात्र, या धडकेमुळे दुय्यम कणांचा एक वर्षाव तयार होतो जो थेट जमिनीपर्यंत पोहोचतो.

यात ‘म्युऑन’ या कणांचा समावेश असतो. म्युऑन हे ऋणात्मक भार असलेले सूक्ष्मकण असून ते इलेक्ट्रॉनसारखेच असतात; पण वजनाने इलेक्ट्रॉनपेक्षा २०० पट जास्त भारी असतात. प्राध्यापक लू लू यांच्या मते, समुद्रसपाटीवर दर मिनिटाला प्रति ०.१५ चौरस इंच (१ चौरस सेमी) क्षेत्रावर एक म्युऑन पार होतो. मनुष्याचा विचार केला तर, ‘‘दर सेकंदाला आपल्या शरीरातून दहा ते शेकडो म्युऑन पार होतात, तर दर सेकंदाला आपल्या हाताच्या तळव्यातून साधारण १ ते २ म्युऑन कण आरपार जातात.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news