

डॉर्सेट (ब्रिटन): बदलत्या काळात गावे शहरात रूपांतरित होतात किंवा नवी वस्ती उभी राहते; मात्र ब्रिटनच्या डॉर्सेटमधील ‘टाईनहम’ हे गाव याला अपवाद आहे. या गावात पाऊल ठेवताच जणू काही काळ 80 वर्षे मागे गेला आहे, असा भास होतो. हे केवळ एक ओसाड गाव नसून, एका मोठ्या बलिदानाची आणि अधुर्या राहिलेल्या आशेची जिवंत साक्ष आहे.
टाईनहम गावासाठी 1943 हे वर्ष निर्णायक ठरले. दुसर्या महायुद्धाचा काळ होता आणि ब्रिटिश सैन्याला प्रशिक्षणासाठी सुरक्षित जागेची गरज होती. टाईनहमची भौगोलिक स्थिती ‘लुलवर्थ फायरिंग रेंज’च्या जवळ असल्याने सैन्याने हे गाव आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. लष्कराच्या एका आदेशाने शेकडो लोकांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. पिढ्यान्पिढ्या राहणार्या या गावकर्यांना त्यांचे घर सोडण्यासाठी लष्कराने केवळ एक महिन्याची नोटीस दिली होती. युद्ध संपल्यावर आपण पुन्हा आपल्या घरी परतू, या आशेने गावकर्यांनी जड अंतःकरणाने गाव सोडले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि लष्कराच्या मदतीसाठी त्यांनी दिलेला हा कौतुकास्पद प्रतिसाद होता; पण हा निरोप कायमचा असेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. गावातील चर्चच्या दरवाज्यावर गावकर्यांनी जाताना एक संदेश लिहून ठेवला होता, जो आजही वाचणार्याचे डोळे ओलावतो. त्या संदेशात लिहिले होते: ‘आम्ही आमची घरे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोडत आहोत. आम्ही एक दिवस नक्की परत येऊ. कृपया आमच्या घरांची आणि गावांची काळजी घ्या.’ हा संदेश आजही त्या तुटलेल्या विश्वासाची आणि अपूर्ण राहिलेल्या परतीच्या प्रवासाची कथा सांगतो.
युद्ध संपले, पण सरकार आणि लष्कराने हे गाव कायमस्वरूपी ‘सैन्य प्रशिक्षण क्षेत्र’ म्हणून घोषित केले. त्यामुळे गावकर्यांचे घराकडे परतण्याचे स्वप्न कायमचे भंग पावले. 80 वर्षांनंतरही हे गाव 1943 मध्ये जसे होते, तसेच जपून ठेवण्यात आले आहे. दगडी घरे, शाळेच्या खोल्या आणि चर्च आजही तिथे उभे आहेत. वर्षातील काही ठरावीक दिवसांसाठी हे गाव पर्यटकांसाठी खुले केले जाते. जेव्हा पर्यटनाची वेळ संपते, तेव्हा गावाचे गेट बंद केले जातात, जणू काळाला पुन्हा टाळे लावले जाते!