

सिडनी : जागतिक स्तरावर सध्या विविध प्रकारे संशोधनं सुरू असून, याच संशोधनांना नव्या तंत्रज्ञानाचीसुद्धा जोड मिळताना दिसत आहे. असंच एक संशोधन सध्या जागतिक स्तरावर पाहायला मिळत असून, यामध्ये युरोपातील पर्वतांमधून संशोधकांनी बर्फाचे काही नमुने जमवत त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी थेट जगाच्या एका टोकावर पाठवलं आहे. युरोपातून जमा केलेले बर्फाचे नमुने जगाच्या ज्या टोकावर पाठवण्यात आले आहेत, ते टोक म्हणजे अंटार्क्टिका. इथं बर्फाची एक खास गुफा तयार करण्यात आली असून, तिथं तापमान -52 अंश सेल्सिअस इतकं असून, ते याच स्तरावर राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जगभरातील ग्लेशियर अतिशय वेगानं वितळत असून, अंटार्क्टिकामध्ये जतन करण्यात आलेला हा जणू काही ‘टाईम कॅप्सूल’ असलेला बर्फ येत्या कैक वर्षांसाठी सुरक्षित राहणार असून, भविष्यातील संशोधकांना यामुळं पृथ्वीवर कधी काळी हवामान नेमकं कसं होतं याचं अध्ययन करण्यास मदत होणार आहे.
शास्त्रज्ञ शॉमस स्टॉकर यांच्या सांगण्यानुसार जी गोष्ट कायमची नष्ट होणार आहे, ती जतन करून ठेवणं हे संपूर्ण विश्वासाठी एक मोठा प्रयत्नच आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार ग्लेशियर वितळल्यामुळे ज्या गोष्टी नष्ट होतील, त्यांना या प्रकल्पवजा मोहिमेअंतर्गत सुरक्षित ठेवलं जाणार आहे. जवळपास 10 वर्षांपासून त्यासाठीचं काम सुरू होतं. बर्फाचे नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे बर्फाचेच तळघर म्हणजे प्रत्यक्षात एक गुंफा असून, ही गुंफा साधारण 35 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद, 5 मीटर उंच आहे. भूपृष्ठापासून ही गुंफा 10 मीटर खोलवर अतिशय टणक बर्फ पोखरून तयार करण्यात आली आहे, जिथं तापमान शून्याहूनही प्रचंड खाली असल्याचं पाहायला मिळतं. इथं तापमान शून्याहूनही बरंच कमी असतं. हे एक असं ठिकाण आहे, जिथं माँटे ब्लँक आणि ग्रँड कंबाईनसारख्या उंच पर्वतांवरून आणलेला बर्फ या बर्फाच्छादित टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आला आहे.
संशोधकांच्या माहितीनुसार या प्रकल्पाअंतर्गत जगाच्या कानाकोपर्यातील बर्फाचे नमुने संग्रहित करण्यात येणार आहे. येत्या काळात यामध्ये अँडीज, हिमालय आणि ताजिकिस्तान अशा उंच पर्वतांकडून बर्फाचे नमुने आणले जाणार आहेत. इथं जमवण्यात येणारे बर्फाचे नमुने एखाद्या जुन्या संग्रहाप्रमाणं असून, त्यामध्ये हजारो वर्षांपूर्वीची रहस्य दडली असून, त्या माध्यमातून जुन्या काळात हवामान कसं होतं, त्या काळात पृथ्वीचं तापमान कसं होतं, कुठं ज्वालामुखीचे उद्रेक झाले होते याची माहिती मिळणार आहे. संशोधकांनी वर्तवलेल्या चिंतेप्रमाणं, पुढील काही वर्षांमध्ये हिमखंड पूर्णपणे नाहीसे होणार असून, असं झाल्यास इतिहासाचे कैक पुरावेही या जगातून लुप्त होणार असल्यानं ते जतन करून ठेवणं ही काळाचीच गरज आहे.