

वॉशिंग्टन : अंतराळाच्या अथांग पसाऱ्यात शास्त्रज्ञांना एक अत्यंत दुर्मीळ दृश्य पाहायला मिळाले आहे. आपल्या मूळ आकाशगंगेतून बाहेर पडून प्रचंड वेगाने प्रवास करणाऱ्या एका ‘सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल’चा (अतिविशाल कृष्णविवर) शोध लागला आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने पाठवलेल्या पुराव्यांमुळे या ‘धावत्या’ कृष्णविवराच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. हे कृष्णविवर सुमारे 2.2 दशलक्ष मैल प्रति तास (36 लाख किमी प्रति तास) या अकल्पनीय वेगाने अंतराळात प्रवास करत आहे. याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या तुलनेत 2 कोटी पट जास्त आहे. शास्त्रज्ञांना या कृष्णविवराच्या समोर एक ‘शॉक वेव्ह’ (धक्का लहरी) दिसून आली आहे, जी हे कृष्णविवर वेगाने पुढे सरकत असल्याचे मुख्य लक्षण मानले जाते.
या कृष्णविवराचा शोध सर्वात आधी 2023 मध्ये येल विद्यापीठातील खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक पीटर व्हॅन डोकुम आणि त्यांच्या टीमने लावला होता. हबल टेलिस्कोपच्या जुन्या फोटोंमध्ये एक पुसट रेषा दिसली होती. ही रेषा नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी हवाई येथील ‘केके वेधशाळे’तून अधिक निरीक्षणे घेण्यात आली. ती रेषा म्हणजे प्रत्यक्षात 20 कोटी प्रकाशवर्ष लांब पसरलेला तरुण ताऱ्यांचा एक ‘वेक’ (प्रवाह) होता. हा प्रवाह आपल्या ‘मिल्की वे’ आकाशगंगेच्या व्यासापेक्षा दुप्पट मोठा आहे.
प्राध्यापक व्हॅन डोकुम यांच्या मते, आम्हाला शंका होती की ही वस्तू एक धावते कृष्णविवर असू शकते, पण आमच्याकडे ठोस पुरावा नव्हता. हा पुरावा शोधण्यासाठी त्यांनी जेम्स वेब टेलिस्कोपची मदत घेतली. या दुर्बिणीने कृष्णविवराच्या वेगवान हालचालीमुळे निर्माण होणारा ‘बो शॉक’ टिपला, जो या शोधाचा सर्वात मोठा पुरावा ठरला आहे. गेल्या 50 वर्षांपासून अशा ‘रनवे’ सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचे अस्तित्व केवळ सिद्धांतांमध्ये मर्यादित होते. मात्र, या नवीन शोधामुळे प्रथमच अशा घटनेची प्रत्यक्ष पुष्टी झाली आहे. हे संशोधन सध्या ‘ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशनासाठी पाठवण्यात आले आहे. आता आमचे पुढचे पाऊल म्हणजे अंतराळात अशा प्रकारची आणखी उदाहरणे शोधणे, असे व्हॅन डोकुम यांनी सांगितले. हे कृष्णविवर नेमके का आणि कसे आकाशगंगेतून बाहेर फेकले गेले, याचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करत आहेत.