Reel Making Course | रील्स बनवण्यासाठी कॉलेजचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम!

तब्बल ३७ लाख रुपये खर्चून तरुणीने घेतली ‘इन्फ्लुएन्सर पदवी’
Reel Making Course |
Reel Making Course | रील्स बनवण्यासाठी कॉलेजचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम!
Published on: 
Updated on: 

लंडन : सध्या इन्स्टाग्राम, यूट्यूबसारख्या व्यासपीठांवर व्हिडीओ तयार करणे हा अनेकांसाठी केवळ छंद न राहता उत्पन्नाचे उत्तम साधन बनला आहे. फॅशन, पर्यटन, खाद्यसंस्कृती किंवा दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित व्हिडीओंच्या माध्यमातून अनेकजण मोठी कमाई करत आहेत. जगातील हाच बदलता प्रवाह ओळखून ब्रिटनमधील डेस्टिनी मॅकगोवन या तरुणीने ‘कंटेंट क्रिएशन’ क्षेत्रात थेट पदवी घेण्याचा निर्णय घेतला. तिने नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातून तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदवीसाठी तिने सुमारे ३० हजार पाऊंड म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपये खर्च केले आहेत.

डेस्टिनीच्या मते, तिने निवडलेल्या या अभ्यासक्रमाचा उद्देश फक्त मोबाईलवरून व्हिडीओ रेकॉर्ड करणे शिकवणे एवढाच मर्यादित नाही. तर सोशल मीडियाकडे एक व्यवसाय म्हणून कसे पाहावे, हे शिकवण्यावर या अभ्यासक्रमात भर दिला जातो. तीन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांना व्यावसायिक व्हिडीओ संपादन (एडिटिंग), प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे (ऑडियन्स रीच), कॉपीराइटचे नियम आणि व्यावसायिक ब्रँडस्‌सोबत काम करण्याचे कौशल्य शिकवले जाते.

कंपन्यांकडून स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी कसा संपर्क साधावा आणि स्वतःचा कंटेंट अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचवावा, याचेही धडे दिले जातात. थोडक्यात सांगायचे तर, सोशल मीडियावरील काम एका उद्योगाप्रमाणे कसे पुढे न्यावे, याचे संपूर्ण प्रशिक्षण येथे मिळते. डेस्टिनीने सांगितले की, तिला नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. तिच्यासाठी हा अभ्यासक्रम म्हणजे केवळ इन्फ्लुएन्सर बनण्याचे माध्यम नव्हते, तर भविष्यात उपयोगी पडणारी विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी होती. विद्यापीठात शिकत असताना तिला व्यावसायिक स्टुडिओमधील अत्याधुनिक उपकरणे वापरण्याची, कामावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्याची आणि इतर कंटेंट क्रिएटर्सशी जोडले जाण्याची संधी मिळाली.

तसेच विद्यापीठातील विविध कार्यक्रम व चर्चासत्रांमुळे अशा तज्ज्ञ व्यक्तींशी थेट संपर्क आला, ज्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्याला ५ ते १० वर्षे लागू शकतात. व्यावसायिक नेटवर्किंग हा तिच्या दृष्टीने या पदवीचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरला. पदवी पूर्ण झाल्यानंतर डेस्टिनी आता सोशल मीडियावर फॅशनशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करते. याव्यतिरिक्त ती इतर व्यक्ती आणि नामांकित कंपन्यांसाठीही व्हिडीओ बनवते. टिकटॉकवर ‘लाइव्ह सेलिंग होस्ट‘ म्हणूनही ती काम करत असून, तिथे विविध उत्पादने प्रेक्षकांना दाखवून त्याबद्दल माहिती देते. सध्या आपण या कामातून चांगली कमाई करत असल्याचे तिने मान्य केले आहे. मात्र, दरमहा किती उत्पन्न मिळते हे तिने उघड केलेले नाही. त्यामुळे शिक्षणासाठी झालेला ३७ लाखांचा खर्च आतापर्यंत भरून निघाला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news