

चेन्नईः तामिळनाडूत पोरुनाई किंवा थामीराबरानी नदीच्या काठी करण्यात आलेल्या उत्खननात हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडले होते. पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात अनेक कलाकृती, भांडी आणि भित्तीचित्रांचे भग्नावशेष सापडलेले आहेत. या कलाकृती 3200 वर्षांपूर्वीच्या असाव्यात असे तज्ज्ञांना वाटते. विशेष म्हणजे सिंधु संस्कृतीमधील अनेक कलाकृतींशीही त्यांचे साम्य असल्याचे आढळले आहे.
तामिळनाडू पुरातत्वं विभागानं केलेल्या एका निरीक्षणपर अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास 90 टक्के भित्तीचित्र सिंधुच्या खोर्यातील संस्कृतीशी मिळतीजुळती आहेत. या संशोधनामुळं भारतातील गतकाळातील इतिहासाची उकल आणखी सखोल पद्धतीनं होत आहे हेच म्हणावं लागेल. तामिळनाडूच्या तुत्तुक्कुडी जिल्ह्यातील शिवगलाई इथं हे खोदकाम करण्यात आलंय जिथं उत्खननातून 700 हून अधिक असामान्य कलाकृती समोर आल्या. यामध्ये गोमेद, काळ्या आणि लाल रंगांची भांडी, मातीपासून तयार करण्यात आलेलं सूत कातण्याचं उपकरण, इंद्रगोप मनका, काचेच्या बांगड्या, शंख अशा गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या उत्खननामध्ये जमिनीत पुरले गेलेले 120 कलश सापडले असून, यामध्ये धान्याचा भुसा सापडला असून, कार्बन डेटिंगच्या माध्यमातून हे सर्व पुरावे साधारण 3200 वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे. सदर उत्खननातून करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार 140 पुरातत्वं क्षेत्रांतून मिळालेल्या 15500 भित्तीचित्रयुक्त भांड्यांचं डिजिटलीकरण करण्यात आलं. यामध्ये तुलनात्मक निरीक्षणातून असे संकेत मिळत आहेत की, सिंधूच्या खोर्यातील संस्कृती आणि दक्षिण भारतातील लोहयुगीन वस्त्यांमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण झाली असावी. हे पुरावे पूर्णपणे सिद्ध झाले नसले तरीही शोध मात्र त्याच दिशेनं खुणावतो आहे.