

सिडनी ः ऑस्ट्रेलियातील एका डेथ अॅडर सापामध्ये दोन नव्हे, तर तीन अत्यंत तीक्ष्ण आणि विषारी सुळे असल्याचे आढळले आहे. हा शोध आपल्या प्रकारातील पहिलाच असून, संशोधकांना यापूर्वी असा साप कधीही आढळलेला नव्हता. ‘आम्ही आजपर्यंत असे काहीही पाहिले नव्हते,’ असे ऑस्ट्रेलियन रेप्टाइल पार्कचे व्यवस्थापक बिली कोलेट यांनी सांगितले. या सापाला सात वर्षांपासून विष उपसा कार्यक्रमाचा भाग बनवण्यात आले होते, मात्र आताच तिसर्या सुळ्याचा शोध लागला. ‘मला वाटले की ते काही काळाने गळून पडेल, पण एक वर्ष उलटून गेल्यानंतरही ते तसेच आहे!’
हा तिसरा सुळा, डाव्या बाजूच्या मूळ सुळ्याच्या अगदी शेजारी असून तो देखील विष निर्माण करतो. त्यामुळे या सापाच्या प्रत्येक चाव्याने विषाचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असते आणि तो सामान्य डेथ अॅडरपेक्षा अधिक प्राणघातक ठरतो. ‘हा जगातील सर्वात धोकादायक डेथ अॅडर साप असू शकतो,’ असे कोलेट यांनी एका मुलाखतीत सांगितले. ऑस्ट्रेलियन रेप्टाइल पार्कच्या तज्ज्ञांच्या मते, हा तिसरा सुळा एका अत्यंत दुर्मीळ उत्परिवर्तनाचा परिणाम आहे. डेथ अॅडर हा अत्यंत वेगाने हल्ला करणार्या सापांपैकी एक आहे आणि तो 0.15 सेकंदांपेक्षा कमी वेळेत चावा घेऊ शकतो. याच्या विषात न्यूरोटॉक्सिन असतात, जे शरीराला पक्षाघात करू शकतात आणि वेळीच उपचार न झाल्यास मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. अँटीव्हेनम तयार होण्यापूर्वी, डेथ अॅडरच्या चाव्यांमुळे सुमारे 50 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असे. हा साप ऑस्ट्रेलियन रेप्टाइल पार्कच्या अँटीव्हेनम उत्पादन कार्यक्रमाचा भाग असून, त्याच्या विष उपसादरम्यान त्याच्या तिसर्या सुळ्याचा शोध लागला. विष उपसादरम्यान, सापाला सौम्य दाब दिला जातो आणि त्याच्या सुळ्यांमधून एकत्रित केलेले विष एका संकलन काचेच्या नळीत साठवले जाते. या सापाच्या तिन्ही सुळ्यांमधून विष बाहेर पडत असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याचे प्रमाण सामान्य सापांपेक्षा दुप्पट होते. ऑस्ट्रेलियात यापूर्वी इतर तीन सुळ्यांचे साप आढळले असले, तरी डेथ अॅडर प्रजातीतील हा पहिलाच ज्ञात साप आहे. त्यामुळे या संशोधनाने सर्पशास्त्रज्ञांचे आणि जैवविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.