Brain2Qwerty v2 | आता फक्त विचार करून मेसेज टाईप होणार

मेटाने आणली ‘विनाचिप’ चालणारी एआय सिस्टीम
Brain2Qwerty v2 |
Brain2Qwerty v2 | आता फक्त विचार करून मेसेज टाईप होणार
Published on
Updated on

वॉशिंग्टनः मेटा कंपनीने आपल्या ‘डिजिटल ब्रेन प्रोजेक्ट’अंतर्गत ‘ब्रेन२क्वर्टी व्ही२’ (Brain2Qwerty v2) नावाची एक नवीन एआय सिस्टीम सादर केली आहे. हे तंत्रज्ञान मानवी मेंदूच्या न्यूरल ॲक्टिव्हिटी (ब्रेन सिग्नल्स) डीकोड करून त्याचे लिखित मजकुरात (टेक्स्ट) रूपांतर करू शकते.

हे तंत्रज्ञान प्रामुख्याने अशा लोकांसाठी विकसित केले गेले आहे, जे ब्रेन लेशन्स, पॅरालिसिस (पक्षाघात) किंवा इतर गंभीर न्यूरोलॉजिकल आजारांमुळे बोलू शकत नाहीत किंवा आपली बाजू मांडू शकत नाहीत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने असे लोक भविष्यात केवळ विचार करून आपले म्हणणे टाईप करू शकतील. मेटाने सादर केलेली ‘ब्रेन२क्वर्टी व्ही२’ ही सिस्टीम मानवी मेंदूचे सिग्नल्स समजून घेऊन त्यांचे थेट टेक्स्टमध्ये रूपांतर करू शकते. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी मेंदूमध्ये कोणतीही चिप किंवा इलेक्ट्रोड बसवण्याची गरज पडत नाही. म्हणजेच, हे पूर्णपणे नॉन-इनवेसिव्ह (Non-Invasive) तंत्रज्ञान आहे.

मेटाची ही नवीन सिस्टीम MEG म्हणजेच ‘मॅग्नेटोएन्सेफॅलोग्राफी’ (Magnetoencephalography) तंत्रज्ञानाचा वापर करते. हे तंत्रज्ञान मेंदूच्या न्यूरल हालचालींमधून निघणारे अतिसूक्ष्म चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फील्डस्‌) रेकॉर्ड करते. यासाठी यूझरला कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया (सर्जरी) करण्याची गरज नाही. त्याला फक्त एक विशिष्ट गिअर किंवा हेल्मेटसारखे उपकरण घालावे लागेल, जे मेंदूच्या हालचाली रेकॉर्ड करत राहील. यानंतर एआय मॉडेल या सिग्नल्सचे विश्लेषण करून त्यांचे टेक्स्टमध्ये रूपांतर करेल.

जुन्या आवृत्त्यांच्या तुलनेत, हे नवीन ‘ब्रेन२क्वर्टी व्ही२’ एंड-टू-एंड डीप लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करते. ज्यामुळे ते थेट मेंदूच्या मूळ (रॉ) सिग्नल्सवरून भाषा समजू आणि डीकोड करू शकते. मेटाचा असा दावा आहे की, या सिस्टीमने सुरुवातीच्या चाचण्यांमध्येच अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चाचण्यांदरम्यान या सिस्टीमने सरासरी ६१ टक्के शब्दांची अचूकता मिळवली आहे. सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ही अचूकता तब्बल ७८ टक्के नोंदवली गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डीकोड केलेल्या अर्ध्याहून अधिक वाक्यांमध्ये केवळ एक किंवा त्याहून कमी शब्दांची चूक आढळून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news