

वॉशिंग्टन ः डायनासोर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर आक्रमक व भयावह असे टी-रेक्स डायनासोरच उभे राहतात. ज्युरासिक पार्कसारख्या चित्रपटांमध्येही असेच डायनासोर दाखवलेले आहेत. अर्थातच पृथ्वीवर अनेक प्रकारच्या डायनासोर प्रजाती होत्या. खोल समुद्रात सापडलेल्या एका विशाल ‘समुद्री राक्षसा’च्या खोपडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा जीव ‘अंडरवॉटर टी-रेक्स’ म्हणूनच ओळखला जातो. त्याचं वैज्ञानिक नाव आहे ‘प्लायोसॉर’.
हा सुमारे 6 फूट लांब जीवाश्म सन 2023 मध्ये इंग्लंडच्या डोरसेट येथील जुरासिक कोस्टवरील खडकांतून सापडला होता. तो सुमारे 150 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या एका महासागरातील शिकार्याचा आहे. ही खोपडी इतकी संपूर्ण आणि सुस्थितीत आहे की, वैज्ञानिक देखील अचंबित झाले. सोशल मीडियावर ‘कोलोसल बायोसायन्सेस’ या कंपनीला टॅग करत लोकांनी हा प्लायोसॉर पुन्हा निर्माण करावा, अशी मागणी सुरू केली आहे. ही तीच कंपनी आहे जिने अलीकडेच डायर वुल्फ नावाच्या नामशेष प्राण्याची जनुकशास्त्राद्वारे निर्मिती केल्याचा दावा केला. एका युझरने लिहिले, ‘इसे भी जिंदा करो!’ पेलियंटोलॉजिस्ट स्टीव एचेस यांनी सांगितले, ‘ही खोपडी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वांत सुंदर आणि संपूर्ण जीवाश्मांपैकी एक आहे. यातील खालचा जबडा आणि वरची कवटी एकत्र जुळलेली आहे, जशी ती जिवंत असताना असते.’ या खोपडीला 130 दात होते, त्यातील काही दात फार मोठे, टोकदार आणि शिकार फाडण्यासाठी योग्य होते. हा प्लायोसॉर अंदाजे 10 ते 12 मीटर लांब होता आणि त्याच्या चार मजबूत पंखांच्या साहाय्याने तो पाण्यात झपाट्याने हालचाल करायचा. त्याच्या शिकारी क्षमतेमुळे तो त्याच्या काळातील महासागरातील सर्वात मोठा शिकारी मानला जातो.