

टोकियो : जपानच्या संस्कृतीत, आध्यात्मिक परंपरेमध्ये आणि शिंतो धर्मामध्ये 'इझे जिंगु' (Ise Jingu) हे मंदिर सर्वात पवित्र, महत्त्वाचे आणि प्राचीन तीर्थक्षेत्र मानले जाते. मिया प्रिफेक्चरमधील इझे शहरात घनदाट जंगलाच्या मध्यभागी असलेले हे मंदिर जपानच्या राष्ट्रीय अस्मितेचे आणि श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. 'इझे जिंगु' हे एकाच मंदिराचे नाव नसून, सुमारे १२५ हून अधिक लहान-मोठ्या मंदिरांचा समावेश असलेले हा एक विशाल मंदिर संकुल आहे. इथे दर वीस वर्षांनी नव्याने संपूर्ण लाकडी मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा आहे.
या संकुलातील सर्वात महत्त्वाचे मंदिर जपानच्या शिंतो परंपरेनुसार सूर्य देवता 'अमतेरासु ओमिकामी' यांना समर्पित आहे. अमतेरासु हा जपानी सम्राट घराण्याचा पूर्वज मानला जातो. याशिवाय येथे कृषी आणि अन्नाची देवता 'तोयोऊके ओमिकामी' याचेही मुख्य मंदिर आहे. इझे जिंगु मंदिराचे सर्वात मोठे आणि जगाचे कुतूहल आकर्षण म्हणजे 'शिकनेन सेंगु' हा विधी होय. या परंपरेनुसार, मुख्य मंदिर संकुलाच्या बाजूलाच एक अगदी तशीच नवीन वास्तू दर २० वर्षांनी पूर्णपणे लाकडापासून आणि पारंपरिक पद्धतीने नव्याने बांधली जाते. त्यानंतर जुन्या मंदिरातील देवतांचे पावित्र्य नव्या वास्तूत स्थानांतरित केले जाते.
जपानी संस्कृतीत लाकडी वास्तू आणि निसर्गाचे पावित्र्य तसेच सुतारकामाची प्राचीन कौशल्ये पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवण्यासाठी हा सोहळा केला जातो. हा विधी सातत्य, शुद्धता आणि पुनरुत्थानाचे प्रतीक मानला जातो. ७ वे शतक म्हणजेच जवळपास १३०० वर्षांहून अधिक काळ ही परंपरा अखंड सुरू आहे. ही मंदिरे पूर्णपणे नैसर्गिक सायप्रस लाकडापासून बनवली जातात. यांच्या बांधकामात लोखंडी खिळे किंवा नट-बोल्ट वापरले जात नाहीत, जी जपानी वास्तुकलेची एक अनोखी कला आहे. पूर्वी जपानचे सम्राट किंवा शाही कुटुंबातील सदस्यच या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करू शकत असत. सामान्य नागरिकांना केवळ बाहेरील पडद्यामधून प्रार्थना करण्याची मुभा होती. आजही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे पावित्र्य अत्यंत कडकपणे राखले जाते.