China Restaurant Free Noodles | चीनच्या ‘या’ रेस्टॉरंटमध्ये ३,००० लोकांना रोज मोफत नूडल्स!

China Restaurant Free Noodles |
China Restaurant Free Noodles | चीनच्या ‘या’ रेस्टॉरंटमध्ये ३,००० लोकांना रोज मोफत नूडल्स!
Published on: 
Updated on: 

बीजिंग : चीनमधील एका रेस्टॉरंटने आपल्या अनोख्या उपक्रमामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या रेस्टॉरंटमध्ये दररोज हजारो लोकांना कोणतेही पैसे न घेता नूडल्स खाऊ घातले जातात. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती काय आहे, तो श्रीमंत आहे की गरीब, याची कोणतीही चौकशी केली जात नाही. प्रत्येकाला मोफत नूडल्स दिले जाते. या उपक्रमाचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत असले, तरी दुसरीकडे परिसरातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. मोफत जेवणामुळे ग्राहक आपल्या दुकानांकडे पाठ फिरवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चीनमधील जियांग्सू प्रांतातील नानजिंग शहरात हे अनोखे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. ‘झिरो युआन नूडल रेस्टॉरंट’ असे त्याचे नाव असून, शहरात याच्या दोन शाखा आहेत. एक शाखा जियांगनिंग, तर दुसरी युहुआताई जिल्ह्यात आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला नूडल्सची एक प्लेट मोफत दिली जाते. त्यासाठी कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असो किंवा तिला पैशांची अडचण असो, सर्वांना समान वागणूक दिली जाते. या नूडल्समध्ये मशरूम, सोयापासून तयार केलेले पदार्थ आणि विविध भाज्यांचा समावेश असतो.

या उपक्रमाची माहिती पसरल्यानंतर रेस्टॉरंटबाहेर खाण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागायला सुरुवात झाली. या रेस्टॉरंटमध्ये दररोज दोन वेळा नूडल्सचे वाटप केले जाते. सकाळी ११ ते दुपारी १२.३० आणि संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत लोकांना मोफत जेवण मिळते. दोन्ही शाखांमधून मिळून दररोज जवळपास ३ हजार नूडल्सचे बाऊल वितरित केले जातात. रेस्टॉरंटचे मालक झांग यांनी हा उपक्रम सुरू करण्यामागे गरजू लोकांना जेवण उपलब्ध करून देणे हाच उद्देश असल्याचे सांगितले आहे.

या उपक्रमाचा संपूर्ण खर्च ते स्वतः उचलतात. यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवण्याचा त्यांचा हेतू नाही. भविष्यात दररोज ३३ हजारांवरून ५५ हजार लोकांना मोफत नूडल्स देण्याचा त्यांचा विचार आहे. रेस्टॉरंटमध्ये एक संदेशही लावण्यात आला आहे. ज्यांना जेवणाचे पैसे देणे सहज शक्य आहे, त्यांनी मोफत जेवणाचा लाभ न घेता खरोखर गरजू व्यक्तींसाठी ते उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.