

आपल्याला सहसा ठराविक वेळी सूर्योदय आणि सूर्यास्त होतो, याची कल्पना असते. पण, जगात काही अशी ठिकाणे आहेत जिथे हे नैसर्गिक नियम लागू होत नाहीत. काही ठिकाणी सूर्य आठवड्यांपर्यंत मावळत नाही, तर काही ठिकाणी सहा महिने अंधार असतो. चला जाणून घेऊया अशा अनोख्या ठिकाणांविषयी...
नॉर्वे आणि आईसलँड :
कल्पना करा की तुम्ही सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या प्रतीक्षेत आहात, पण सूर्य पूर्णपणे उगवत नाही आणि पूर्णपणे मावळतही नाही. आर्क्टिक सर्कलमधील नॉर्वे (ट्रोम्सो) आणि आईसलँड येथे उन्हाळ्यात अनेक आठवड्यांपर्यंत सूर्य मावळत नाही. या नैसर्गिक घटनेला ‘मिडनाइट सन’ म्हणतात. सततच्या प्रकाशामुळे झोपेचे चक्र बिघडते, त्यामुळे घरात जाड पडदे लावावे लागतात, जेणेकरून रात्रीचा आभास निर्माण करता येईल.
अलास्का, अमेरिका :
अलास्काच्या फेअरबँक्स परिसरात, विशेषतः उन्हाळ्यात, सूर्य अर्धवट दिसतो. तो पूर्णपणे मावळत नाही किंवा वरही जात नाही. त्यामुळे तासन्तास आकाश गुलाबी, सोनेरी आणि जांभळ्या रंगाने भरलेले असते. हे द़ृश्य निसर्गप्रेमींसाठी जणू पर्वणी असते, पण स्थानिक लोकांसाठी रात्र आणि दिवस यामधील फरक ओळखणे कठीण होते.
जपान :
जपानमधील सुप्रसिद्ध माऊंट फुजी पर्वताच्या शिखरावर वर्षातून दोन वेळा सूर्य उगवतो किंवा मावळतो, असे दिसते जणू शिखरावर एखादा चमकता हिरा ठेवला आहे. या अद्भुत द़ृश्याला ‘डायमंड फुजी‘ म्हणतात. हे पाहण्यासाठी योग्य स्थळी आणि योग्य वेळी असणे आवश्यक आहे, कारण जर तुम्ही एक दिवस उशिरा पोहोचलात तर हे द़ृश्य पुन्हा पाहण्याची संधी मिळणे कठीण होईल.
स्वालबार्ड, नॉर्वे :
स्वालबार्ड, नॉर्वे येथे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान एक अनोखी सौर घटना पाहायला मिळते. वायुमंडलीय अपवर्तन ( ईोींहिशीळल ठशषीरलींळेप) मुळे काही विशिष्ट दिवशी सूर्य एका दिवसात दोन वेळा उगवतो आणि मावळतो. त्यामुळे येथे येणारे पर्यटकसुद्धा आश्चर्यचकित होतात.
अंटार्क्टिका :
जगातील सर्वात अनोखा सूर्योदय आणि सूर्यास्त अंटार्क्टिकामध्ये पाहायला मिळतो. येथे वसंत ऋतूत सूर्य एकदाच उगवतो आणि सहा महिने मावळत नाही. याउलट, हिवाळ्यात एकदा सूर्य मावळल्यावर सहा महिने अंधार असतो. येथे प्रवास करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आवश्यक आहे, कारण तुम्हाला सतत प्रकाश किंवा सतत अंधार अशा दोन्ही परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते.
की वेस्ट, अमेरिका :
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील की वेस्ट येथे, सूर्य मावळताना एक रहस्यमय हिरवा प्रकाश चमकतो, ज्याला ‘ग्रीन फ्लॅश’ असे म्हणतात. ही घटना वायुमंडलीय अपवर्तनामुळे घडते आणि केवळ एक सेकंदासाठी दिसते. जर तुम्ही पापणी हलवली, तर कदाचित तुम्ही हे द़ृश्य पाहण्यास मुकाल!