

वॉशिंग्टन : एअरपॉडस् केसइतके छोटे, तुमच्या कीचेन किंवा खिशात सहज मावणारे आणि थेट तुमच्या एआय असिस्टंटशी बोलून कामे करणारे एखादे छोटेसे गॅझेट आले, तर कसे वाटेल? अहवालांनुसार, मार्क झुकरबर्ग यांची ‘मेटा’ कंपनी आपला पहिला एआय हार्डवेअर डिव्हाईस ‘म्यूज चार्म’ बाजारात आणण्याची तयारी करत आहे. अद्याप अधिकृत लॉन्च तारखेची प्रतीक्षा असली, तरी एका नवीन अहवालाने याच्या संभाव्य किमतीवरून आणि त्यासोबत मिळणाऱ्या फायद्यांवरून चर्चा सुरू केली आहे.
‘म्यूज चार्म’ हे आज अनेक कंपन्या बनवत असलेल्या ‘एआय-नेटिव्ह’ डिव्हाईसेसच्या वाढत्या श्रेणीतील एक उपकरण आहे. हे पेंडेंटसारखे हातात धरता येणारे किंवा लटकवता येणारे गॅझेट असून, कीचेन किंवा खिशात सहज ठेवता यावे यासाठी याचा आकार अंदाजे एअरपॉडस् केसइतका सांगितला जात आहे. या डिव्हाईसमध्ये सुमारे २ इंचांच्या टचस्क्रीनसोबत इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय यात फिंगरप्रिंट सेन्सरही दिला जाऊ शकतो. मेटा म्यूज चार्मचा मुख्य उद्देश कंपनीच्या ‘म्यूज’ पर्सनल एआय असिस्टंटपर्यंत थेट पोहोच देणे हा आहे. याच्या माध्यमातून तुम्ही एआय एजंटशी बोलू शकता आणि फोन न उघडताच तुमची अनेक कामे करून घेऊ शकता.
स्क्रीनवर ‘म्यूज’ कॅरेक्टर डिजिटल अवतारच्या रूपात दिसते, ज्याला अंतर्गत पातळीवर ‘जॉली’ म्हटले जाते. हा अवतार तंत्रज्ञानप्रेमींना जपानी डिजिटल पेट खेळण्यातील ‘तमागोची’ची आठवण करून देऊ शकतो; ज्यात लोक लहानशा डिव्हाईसमधील आभासी पाळीव प्राण्याची काळजी घेत असत. मात्र ‘म्यूज’ केवळ एका डिजिटल पेट किंवा खेळण्यापुरते मर्यादित नाही. ते ऑनलाइन खरेदी करणे, विमानाचे तिकीट बुक करणे आणि फॉर्म भरणे यांसारखी कामेही करू शकते. म्यूज चार्म पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये ‘मेटा कनेक्ट’दरम्यान मार्क झुकरबर्ग यांनी दाखवले होते आणि एआय एजंटकडून कामे करून घेण्याचा हा वेगवान मार्ग असल्याचे सांगितले होते. या छोट्या उपकरणात भरपूर तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले असून, तुम्ही चष्मा घातलेला नसेल तर म्यूजशी बोलण्याचा आणि आजूबाजूच्या गोष्टी दाखवण्याचा हा सर्वांत वेगवान मार्ग ठरेल, असे त्यांनी म्हटले होते.
संभाव्य किंमत
‘द इन्फॉर्मेशन’च्या एका अहवालानुसार, मेटा अमेरिकेत म्यूज चार्मची किंमत ३०० डॉलर म्हणजेच सुमारे २८,००० रुपये ठेवू शकते. मात्र या किमतीत तुम्हाला केवळ हे पेंडेंटसारखे एआय डिव्हाईसच मिळणार नाही, तर मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील कंपनी अमेरिकन दूरसंचार कंपनी ‘व्हेरिझॉन’च्या माध्यमातून १२ महिन्यांपर्यंत मोफत ५जी डेटा देण्याचीही योजना आखत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. अहवालांनुसार, म्यूज चार्ममध्ये इनबिल्ट ५जी मॉडेम दिला जाऊ शकतो, जेणेकरून तुमच्या स्मार्टफोनच्या कनेक्शनशिवायही एआय एजंट या डिव्हाईसवर काम करू शकेल. तथापि, या सर्व बाबी सध्या अपुष्ट असून, कंपनीकडून त्यांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. म्यूज चार्म याच वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हे उपकरण अमेरिकेबाहेरही उपलब्ध होईल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.