नवी दिल्ली ः पृथ्वीचा 70.92 टक्के पृष्ठभाग समुद्राने व्यापलेला आहे. याचा अर्थ पृथ्वीचे सुमारे 36,17,40,000 चौरस किलोमीटरचे क्षेत्र समुद्राचे आहे. प्रशांत, अटलांटिक, हिंद, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक असे पाच महासागर आहेत. त्यापैकी सर्वात मोठा महासागर म्हणजे प्रशांत (पॅसिफिक) महासागर. अमेरिका आणि आशियाला हाच महासागर विभाजित करतो.
प्रशांत व अटलांटिक या दोन महासागरांचा विस्तार पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण अशा दोन्ही गोलार्धांमध्ये आहे. त्यामुळे विषुववृत्ताच्या उत्तरेला उत्तर प्रशांत महासागर व दक्षिणेला दक्षिण प्रशांत महासागर आहे. हे दोन वेगळे मानले तर जगातील महासागरांची संख्या सात होते. प्रशांत महासागराचे क्षेत्रफळ सुमारे 16,62,40,000 चौरस किलोमीटर आहे. जगातील सर्व महासागरांमधील हा 45.8 टक्के हिस्सा आहे. त्याचे क्षेत्रफळ अटलांटिक महासागराच्या दुप्पटीपेक्षाही अधिक आहे. हा महासागर फिलिपाईन्सच्या तटापासून पनामापर्यंत 9455 मैल रुंद आणि बेरिंगपासून अंटार्क्टिकापर्यंत 10,492 मैल लांब आहे. हा सर्वात खोल महासागरही आहे. त्याची सरासरी खोली 3939 मीटर आहे. हिंद महासागरही प्रशांत महासागराशी जोडलेला आहे. प्रशांत महासागरात संपन्न जैवविविधता पाहायला मिळते. या महासागरातील अनेक जलचर प्रजातींची अद्याप विज्ञानाला ओळख झालेली नाही.