

प्रयागराज : ‘द लार्जेस्ट ह्युमन गॅदरिंग’ म्हणजेच पृथ्वीवरील मानवांचा सर्वात मोठा मेळा असे ज्याला म्हटले जाते तो महा कुंभमेळा प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सध्या सुरू आहे. या कुंभमेळ्याकडे अवघे जग आकर्षित झालेले आहे. त्यामधून अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरही सुटलेले नाहीत! अमेरिकन अंतराळवीर डॉन पेटिट यांनी पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून या कुंभमेळ्याच्या रात्रीच्या झगमगाटाचे अंतराळ स्थानकावरून छायाचित्र टिपून ते सोशल मीडियात शेअर केले आहे.
प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी स्नान केले. यात्रेकरूंची संख्या दिवसागणिक वाढत असून, दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी आणि आध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने यंदाच्या महाकुंभला45 कोटींहून भाविक येतील, असा अंदाज यापूर्वी व्यक्त केला आहे. देशासह जगभरातून भाविक मोठ्या उत्साहात आणि हिरिरीने दाखल होऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान घेत आहेत.
दरम्यान, डॉन पेटीट या अंतराळवीराने अवकाशातून महाकुंभचे छायाचित्र टिपले आहे. गंगा नदीवरून रात्रीच्या काळातील फोटो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून टिपण्यात आले आहे. यामध्ये गंगा नदीचा भाग कसा उजळून निघालाय हे स्पष्ट दिसतंय. काही दिवसांपूर्वी इस्रोनेही काही फोटो टिपले होते. इस्रोने भारताच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांचा आणि डे-नाईट रडारसॅटचा वापर करून, हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभमेळ्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीची छायाचित्रे टिपली होती. डॉन पेटीट यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘2025 महा कुंभ मेला गंगेज रिव्हर पिलग्रीमेज फ्रॉम द आयएसएस अॅट नाईट. द लार्जेस्ट ह्युमन गॅदरिंग इन द वर्ल्ड इज वेल लिट’. ‘एक्स’ वर त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, 40 कोटी भाविकांसाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ नगर नावाचा एक नवीन जिल्हा तयार केला आहे. ज्यामध्ये 1,50,000 हून अधिक तंबू, 3,000 स्वयंपाकघरे, 1,45,000 स्वच्छतागृहे आणि 99 पार्किंग लॉटचा समावेश आहे.