

वॉशिंग्टन : दीर्घकाळ आजाराशी झुंज देणारे रुग्ण जेव्हा बराच काळ एकाच जागेवर किंवा बेडवर झोपून असतात, तेव्हा त्यांना ‘बेडसोर्स’ (पाठीवर किंवा शरीरावर पडणारे व्रण) होण्याचा मोठा धोका असतो. अशा गंभीर रुग्णांना या बेडसोर्सच्या त्रासाला नाईलाजाने सामोरे जावे लागते. अशाच रुग्णांना दिलासा देण्यासाठी लुसियाना येथील १८ वर्षीय माया ट्रुट्शल हिने एक अनोखी सिस्टीम तयार केली आहे. तिच्या या यशस्वी शोधासाठी तिला २५,००० डॉलर्सची (सुमारे २१ लाख रुपये) स्कॉलरशिपही मिळाली आहे.
आयसीयूमधील रुग्णांना होणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी मायाने अवघ्या १३० डॉलर (सुमारे ११,००० ते १३,००० रुपये) खर्चून ही सिस्टीम बनवली आहे. रुग्ण बऱ्याच दिवसांपासून बेडवर पडून राहिल्यास सुरुवातीला त्वचेवर काहीही बदल दिसत नाहीत, पण आतून ऊती खराब होऊ लागतात. जेव्हा नर्सच्या हे लक्षात येते, तोपर्यंत जखम बरीच मोठी झालेली असते. मायाने बनवलेली ही यंत्रणा प्रेशर इंज्युरी (बेडसोर्स) दिसण्यापूर्वीच तिचा अंदाज लावते. या शोधासाठी तिला ‘डेव्हिडसन फेलो स्कॉलरशिप’ने सन्मानित करण्यात आले आहे.
क्लेव्हलँड क्लिनिकच्या मते, एकट्या अमेरिकेत दरवर्षी २५ लाख लोकांना बेडसोर्स होतात आणि सुमारे ६०,००० रुग्णांचा यामुळे मृत्यू होतो. बेडसोर्स टाळण्यासाठी रुग्णाला वेळोवेळी कुस बदलावी लागते. परंतु, हे व्रण खूप उशिरा दिसून येत असल्याने वेळेवर उपचार करणे कठीण जाते. मायाच्या सिस्टीममध्ये दोन मुख्य घटकांचा समावेश आहे: संगणक प्रोग्राम: जो प्रेशर इंज्युरीची अचूक माहिती देतो. थर्मल कॅमेराः जो रुग्णाच्या शरीराच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवतो आणि रुग्णाला मदतीची किंवा कुस बदलण्याची गरज असल्यास नर्सला तत्काळ अलर्ट पाठवतो. यासाठी तिने ‘MIMIC-IV’ डेटाबेस आणि आयसीयू रुग्णांच्या रिअल डेटाचा वापर करून मशीन लर्निंग मॉडेल तयार केले आहे. मायाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील रुग्णांवर या सिस्टीमची १५० तास चाचणी घेण्यात आली असून यामध्ये ९९ टक्के अचूकता दिसून आली आहे. जखम प्रत्यक्ष दिसण्यापूर्वीच ही सिस्टीम अलर्ट देत असल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.