वीस वर्षांपासून पोटात होती कात्री

वीस वर्षांपासून पोटात होती कात्री

ढाका : मानवी शरीरामध्ये असे काही आढळून येते की, ते पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. काहीवेळा डॉक्टरांच्या दुर्लक्षपणाचा प्रताप असतो. असाच अनुभव बांगलादेशातील महिलेला आला. तिला गेल्या 20 वर्षांपासून सतत आणि तीव्र पोटदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र, ज्यावेळी तिची तपासणी करण्यात आली, त्यावेळी डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.

55 वर्षीय 'बचेना खातून' ही बांगलादेशीय महिला गेल्या दोन दशकांपासून पोटदुखीने त्रस्त होती. 2002 मध्ये तिच्यावर गॉल ब्लॅडरच्या स्टोनचे ऑपरेशन करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी पोटदुखीस सुरुवात झाली. डॉक्टरांना दाखविले असता त्यांनी अशा ऑपरेशनमध्ये त्रास होतो, त्याकडे लक्ष न देण्यास सांगितले. तिने आपल्या पोटदुखीवर अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतला.

उपचारासाठी तिला घरातील सर्वकाही विकावे लागले. मात्र, तिला पोटदुखीपासून आराम मिळाला नाही. त्यानंतर आणखी एका डॉक्टरकडे गेली असता त्याने बचेना खातूनला पोटाचा एक्स-रे घेण्यास सांगितले. एक्स-रेमध्ये जे काही दिसले ते पाहून डॉक्टरही अचंबित झाले. तिच्या पोटात 20 वर्षांपासून कात्री टोचत होती. 2002 मध्ये शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांचा हा दुर्लक्षपणाचा परिणाम होता. बचेना खातूनवर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया करून कात्री बाहेर काढण्यात आली. सध्या तिची प्रकृती सुधारत आहे. डॉक्टरांच्या अक्षम्य चुकीच्या 20 वर्षांपूर्वीच्या घटनेची आता त्रिसदस्यीय समिती चौकशी करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news