Most Expensive Rose | पंधरा वर्षांच्या मेहनतीनंतर बनला होता सर्वात महागडा गुलाब

Most Expensive Rose | पंधरा वर्षांच्या मेहनतीनंतर बनला होता सर्वात महागडा गुलाब
Published on: 
Updated on: 

लंडन : गुलाब हे प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. बाजारात विविध रंगांचे आणि सुवासिक गुलाब पाहायला मिळतात, ज्यांच्या किमती सामान्यतः काही रुपयांपासून ते शेकडो रुपयांपर्यंत असतात. मात्र, जर तुम्हाला असे विचारले की, एका गुलाबाची किंमत कोटींच्या घरात असू शकते, तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. जगातील सर्वात महागड्या गुलाबाचे नाव ‘ज्युलिएट रोज’ असे आहे, ज्याची किंमत ऐकून कोणाच्याही डोळे विस्फारतील.

‘ज्युलिएट रोज’ ही कोणतीही साधारण गुलाबाची जात नाही, तर प्रसिद्ध ब्रिटिश गुलाब संकरक (Rose Breeder) डेव्हिड ऑस्टिन यांनी अत्यंत मेहनत घेऊन ही नवी प्रजाती विकसित केली आहे. हा अतिशय दुर्मीळ गुलाब तयार करण्यासाठी त्यांना तब्बल १५ वर्षे मेहनत घ्यावी लागली आणि यादरम्यान कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. डेव्हिड ऑस्टिन यांनी २००६ मध्ये लंडन येथील प्रतिष्ठित ‘चेल्सी फ्लॉवर शो’ मध्ये हा गुलाब पहिल्यांदा जगासमोर आणला. आपल्या अद्वितीय सौंदर्यामुळे आणि मनमोहक आकारामुळे या गुलाबाने अवघ्या काही दिवसांत संपूर्ण पुष्पसृष्टीत खळबळ उडवून दिली. हा गुलाब जेव्हा कळीच्या स्वरूपात असतो, तेव्हा त्याचा रंग फिकट पिवळसर-पांढरा दिसतो.

मात्र, जसे फूल पूर्णपणे उघडते, तसे त्याच्या आतील पाकळ्यांचा रंग हलका गुलाबी आणि खोल ॲप्रिकॉट रंगाचा होतो. याची रचना एखाद्या सुंदर पियूनी फुलासारखी गोल आणि कपच्या आकारात दिसते. या गुलाबाचा सुवास अतिशय सौम्य, मध आणि बदाम फुलांच्या सुवासासारखा मनमोहक असतो. या गुलाबाच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या दुर्मीळतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोटींच्या घरात मोजली जाते. सुरुवातीला हा गुलाब विक्रमी ३ दशलक्ष ब्रिटिश पाऊंड (भारतीय चलनानुसार सुमारे ३० ते १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक) मूल्याचा मानला गेला होता. अतिशय देखणा आणि रॉयल लूक देणारा हा ‘ज्युलिएट रोज’ जगातील सर्वात श्रीमंत आणि शाही विवाह सोहळ्यांमध्ये आवर्जून वापरला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news