

लंडन : जगातील सर्वात मोठे आणि मौल्यवान माणिक म्हणून ‘एस्ट्रेला डी फुरा’ची प्रसिद्धी आहे. मोझांबिकमधील खाणीत सापडलेले आणि ‘एस्ट्रेला डी फुरा’ या नावाने ओळखले जाणारे माणिक न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘सोथबी’ लिलावगृहात तब्बल ३४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २८८ कोटी रुपयांना विकले गेले होते. ते आजवरच्या लिलावाच्या इतिहासात विकला गेलेला जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक मौल्यवान माणिक ठरले आहे.
हे अद्भुत माणिक जुलै २०२२ मध्ये आफ्रिका खंडातील मोझांबिक देशातील ‘मोन्टेपुएझ’ येथील ‘फुरा जेम्स’ या खाण कंपनीला सापडले होते. खाणीतून बाहेर काढले तेव्हा या कच्च्या दगडाचे वजन तब्बल १०१ कॅरेट होते. पोर्तुगीज भाषेत ‘एस्ट्रेला डी फुरा’चा अर्थ ‘फुराचा तारा’ असा होतो. या कच्च्या दगडावर जगभरातील तज्ज्ञ कारागिरांनी अतिशय नक्षीदार आणि कौशल्याने पैलू पाडले. या प्रक्रियेनंतर त्याचा अंतिम आकार ५५.२२ कॅरेटचा झाला. रत्नशास्त्रज्ञांच्या मते, या माणकाचा रंग अतिशय दुर्मीळ मानला जाणारा ‘पिजन ब्लड’ म्हणजेच गडद लाल चुटूक आहे.
यामध्ये कमालीची स्पष्टता असून त्यात अजिबात अशुद्धता किंवा क्रॅक्स नाहीत. ५५.२२ कॅरेट वजनाचा हा माणिक विकला जाताच, याने यापूर्वीच्या ‘सनराईज रुबी’चा (२५.५९ कॅरेट - सुमारे ३०.३ दशलक्ष डॉलर्स) विक्रम मोडीत काढला. शतकातून किंवा हजारो वर्षांतून असा एखादाच नैसर्गिक मौल्यवान खजिना पृथ्वीच्या पोटातून बाहेर येतो, असे मत या प्रसंगी रत्नशास्त्रज्ञांनी व्यक्त केले. नैसर्गिक स्वरूपात सापडलेल्या कच्च्या माणकांमध्ये ‘१२५.५ कॅरेटचा बर्मा रुबी’ आणि ‘प्रिन्स ऑफ बर्मा’ हे सर्वात मोठे मानले जातात; परंतु पैलू पाडून उत्कृष्ट दागिन्याच्या स्वरूपात लिलाव झालेले ‘एस्ट्रेला डी फुरा’ हेच जगातील सर्वात मोठा माणिक ठरले आहे.