

लंडन : प्राचीन रोममधील सर्वात प्रसिद्ध आणि शाही पोशाख कोणता होता हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचे नाव होते ‘रोमन टोगा’. हा लोकरीपासून बनवलेला एक खूप मोठा, लांब आणि अर्धवर्तुळाकार आकाराचा कपडा असायचा. हा कपडा शरीरावर गुंडाळण्याची पद्धत इतकी खास होती की, तो केवळ एक वस्त्र राहिला नव्हता; तर ते परिधान करणाऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक स्थान आणि नागरिकत्वाचे सर्वात मोठे प्रतीक बनले होते.
टोगा घालण्याची ही परंपरा रोमन गणराज्याच्या काळापासून चालत आलेली आहे. पुढे चालून रोमन साम्राज्याच्या काळात या कपड्याचे महत्त्व आणखी वाढले. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काळात पुरुष घराबाहेर पडताना हा पोशाख एका सामान्य कपड्याप्रमाणे वापरत असत. मात्र, एवढ्या मोठ्या आणि लांब कपड्याला शरीरावर व्यवस्थित सेट करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागायची. याच कारणामुळे नंतरच्या काळात याचा वापर दररोजच्या वापराऐवजी फक्त महत्त्वाच्या आणि औपचारिक प्रसंगांपुरताच मर्यादित राहिला. रोममध्ये प्रत्येक व्यक्ती एकसारखा टोगा घालत नसे.
समाजात माणसाचे जे स्थान असायचे, त्यानुसार त्याचा टोगाही बदलायचा. याचे मुख्य प्रकार असे होते :
टोगा विरिलिस : हा रोममधील सामान्य वयस्क पुरुषांचा सर्वात साधा टोगा असायचा. टोगा प्राटेक्स्टा : हा खास टोगा समाजातील उच्च पदस्थ लोकांसाठी होता. याच्या कडांवर बनवलेली जांभळ्या रंगाची पट्टी ही याची मुख्य ओळख होती.
टोगा कॅन्डिडा : हा टोगा एकदम चमकदार आणि शुभ्र पांढऱ्या रंगाचा असायचा. निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार बहुदा हाच टोगा घालून जनतेसमोर जायचे.
टोगा पिक्टा : हा सर्वात सुंदर, रंगीबेरंगी आणि नक्षीदार टोगा होता. जेव्हा एखादा महान सेनापती युद्ध जिंकून परत यायचा किंवा सम्राट एखादा मोठा शाही सोहळा आयोजित करायचे, तेव्हा हा खास पोशाख परिधान केला जायचा. रोमन समाजात टोगा परिधान करणे ही केवळ एक फॅशन किंवा आवड नव्हती, तर ती व्यक्ती रोमची नागरिक असल्याचा तो पक्का पुरावा मानला जायचा. याच कारणामुळे न्यायालयातील कामकाज, राजकीय बैठका, धार्मिक पूजा-पाठ आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये टोगा घालून जाणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात असे.