Blue Skin Family | एक होते निळ्या त्वचेचे कुटुंब!

Blue Skin Family |
Blue Skin Family | एक होते निळ्या त्वचेचे कुटुंब!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : रक्ताच्या नात्यातील विवाहांना (Consanguineous Marriages) आळा घालण्यासाठी कायदा करण्याचा विचार करावा, असे निर्देश गेल्या आठवड्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. या निमित्ताने आनुवंशिक विकारांचे विज्ञान आणि अशा विवाहांमुळे उद्भवणारे धोके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अमेरिकेतील पूर्व केंटकीच्या डोंगराळ भागात स्थायिक झालेले 'फ्युगेट' कुटुंब. या कुटुंबातील अनेक सदस्यांची त्वचा चक्क निळ्या रंगाची होती आणि यामागे रक्ताच्या नात्यातील विवाहांमधून आलेला एक आनुवंशिक विकार कारणीभूत होता.

'हिस्ट्री एक्स्ट्रा'च्या अहवालानुसार, या कुटुंबाची सुरुवात १८२० मध्ये झाली, जेव्हा मार्टिन फ्युगेट हा फ्रेंच स्थलांतरित अमेरिकेत आला. त्याने एलिझाबेथ स्मिथ या अमेरिकन महिलेशी विवाह केला. दोघांनाही ठाऊक नव्हते की, दोघांमध्येही एका दुर्मीळ आनुवंशिक विकाराचा अप्रकट जनुक (recessive gene) आहे. मार्टिन आणि एलिझाबेथ यांना झालेल्या सात मुलांपैकी चार मुलांचा जन्म निळ्या त्वचेसह झाला. त्यामुळे या दाम्पत्याला मोठा धक्का बसला. या मुलांना इतर कोणताही स्पष्ट आरोग्यविषयक त्रास नव्हता आणि त्यांचे आयुष्य सामान्य होते; परंतु त्यांच्या त्वचेचा रंग निळाच राहिला.

केंटकीतील 'ट्रबलसम क्रीक' या अत्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात हे कुटुंब राहत असल्याने बाहेरच्या लोकांशी विवाह होणे कठीण होते. परिणामी, मोजक्याच कुटुंबांमध्ये आपापसांत विवाह होऊ लागले आणि पुढच्या पिढ्यांमध्ये निळ्या त्वचेच्या सदस्यांची संख्या वाढत गेली. जगात या कुटुंबाची ओळख 'ब्लू पीपल ऑफ केंटकी' (केंटकीचे निळे लोक) अशी झाली. १९६० मध्ये रक्तविकारतज्ज्ञ डॉ. मॅडिसन कॅवेन आणि परिचारिका रुथ पेंडरग्रास यांनी रॅचेल आणि पॅट्रिक रिची या निळ्या त्वचेच्या भावंडांचा अभ्यास केला, तेव्हा हा प्रकार जगासमोर आला. या कुटुंबाला 'मेथेमोग्लोबिनेमिया' (Methemoglobinemia) नावाचा दुर्मीळ आनुवंशिक रक्तविकार असल्याचे निदान झाले. या विकारामुळे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

सर्वसामान्य व्यक्तीच्या रक्तात मेथेमोग्लोबिनचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी असते, तर या कुटुंबातील सदस्यांमध्ये हे प्रमाण १० ते २० टक्क्यांपर्यंत होते. मात्र, साध्या गोळ्यांच्या साहाय्याने या विकारावर नियंत्रण मिळवता येते, हे डॉ. कॅवेन यांनी शोधून काढले. त्यानंतर हळूहळू या कुटुंबातील निळ्या त्वचेचे प्रमाण कमी होत गेले. या कुटुंबातील शेवटचा निळ्या त्वचेचा सदस्य १९७५ मध्ये समोर आला होता. अलीकडील वैद्यकीय अभ्यासांचा दाखला देत याचिकेत म्हटले आहे की, रक्ताच्या नात्यात विवाह केल्याने आनुवंशिक दोष वाढतात. यामुळे मुलांमध्ये जन्मजात व्यंग, ज्ञानेंद्रियांचे दोष, विकासात्मक अपंगत्व आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याचा मोठा धोका असतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या विषयावर कायदा करण्याबाबत विचार करण्यास सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.