

नवी दिल्ली ः काही शहरं अशी असतात की, तेथील रहाणीमान एकदम महागडे असते. तर काही शहरांत जीवनमान एकदम साधे असते, सर्वांना परवडणारे तेथील दर असतात. काही शहरे ही उद्योगांसाठी ओळखली जातात, तर काही शहरांत लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. काही शहरांना शिक्षणाचे केंद्र मानले जाते, तर काही शहरे अशीही असतात जी पर्यटनस्थळांसाठी देखील प्रसिद्ध असतात. आज आपण भारताचा सर्वात छोटा जिल्हा म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते, हे पाहणार आहोत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ इतके लहान आहे की, येथे आपण पायीदेखील संपूर्ण जिल्हा फिरू शकतो.
भारतात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जमेस धरून एकूण 797 जिल्हे आहेत. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करता येथे सर्व सोयी सुविधा आहेत. भारताचा सर्वात छोटा जिल्हा पुडुचेरीचा माहे जिल्हा आहे. पुडुचेरी एक केंद्रशासित प्रदेश आहे. क्षेत्रफळाच्या हिशेबात हा देशाचा सर्वात छोटा जिल्हा आहे, जो केवळ 9 चौरस किलोमीटर पसरलेला आहे. या जिल्ह्याच्या एका बाजूला अरबी समुद्र आहे. तर दुसर्या बाजूला केरळ राज्याची सीमा आहे. येथे राहणारे स्थानिय लोक मळ्याळमसह फ्रेंच भाषेतदेखील बोलतात. या जिल्ह्यावर फ्रेंच वसाहतीच्या काळातील छाप आजही पाहायला मिळते. शहरातील इमारती फ्रेंच पद्धतीच्या आहेत. येथे देशी आणि विदेशी दोन्ही संस्कृतींचा संगम झाल्याचे म्हटले जाते.