

मुंबई : बॉलीवूड गायिका पलक मुच्छल तिच्या सुरेल आवाजासोबतच तिच्या निःस्वार्थ समाजसेवेसाठी देखील ओळखली जाते. ती तिच्या कमाईचा बहुतांश भाग वंचित मुलांच्या आरोग्यावर खर्च करते. आजपर्यंत हजारो मुलांना हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे. गायिका पलक मुच्छालची एक उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेण्यासारखी आहे. पलक तिच्या स्टेज शोमधून मिळणारे सर्व पैसे मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांवर खर्च करते. तिच्या नवर्याने म्हणजेच मिथुनने हे उघड केले की पलकला मुलांबद्दल विशेष भावना आहे. आर्थिक अडचणींमुळे गरीब मुलांनी आपले जीवन गमावावे, असे तिला वाटत नाही. असे झाल्यास तिला खूप दुःख होते.
तिने स्पष्ट केले की, कधी कधी स्टेज शोमधून मिळणारे पैसे पुरेसे नसतात, कारण अनेक शस्त्रक्रिया खूपच जास्त खर्चिक असतात. ‘आम्ही सर्वात तातडीच्या केसेस आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो; परंतु कधी कधी जेव्हा स्टेज शो होत नाहीत, तेव्हा आम्ही हतबल पालकांच्या मुलांसाठी शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आमच्या बचतीतून पैसे घेतो आणि शस्त्रक्रिया पार पाडतो. पलक मुच्छल, तिचा भाऊ पलाश सोबत, पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशन नावाचे एक हृदयरोग फाऊंडेशन चालवते. या फाऊंडेशनच्या माध्यमातून, गायिकेने 3800 हून अधिक मुलांवर हृदयरोग शस्त्रक्रिया करायला मदत केली आहे.
बरेच जण अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत आणि त्या सगळ्यांनाच पलक वर खूप विश्वास आहे. त्यांनी याआधी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये लोकांना शक्य तितके दान करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी लोकांना शक्य तितके किंवा कमीत कमी 100 रुपये तरी देण्यास सांगितले होते. सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांसह शेअर केली. चाहत्यांनी या पोस्टवर भावनिक कमेंटस् केल्या आहेत.
एकाने लिहिले की, ‘ब्युटी विथ गोल्डन हार्ट’, तर दुसर्याने ‘अ सिंगर विथ हार्ट’ व तिसर्या चाहत्याने लिहिलं की ‘खूप प्रेरणादायी काम आहे तुझं, जर जगात सगळेच एवढेच सुस्वभावी झाले तर..’ 2013 मध्ये, पलकने 2.5 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा करून एका वर्षात 572 तिच्या सामाजिक कार्यामुळे तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मान्यता मिळाली. वंचित मुलांना मदत करण्याची पलकची आवड खरंच प्रेरणादायी आहे. एकेदिवशी तिने गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला आणि त्यावर ती आजपर्यंत काम करतेय. यापूर्वी, 1999 मध्ये पलकने कारगिल युद्धात बाधित कुटुंबांना मदत केली होती. त्या कुटुंबांसाठी पैसे उभारण्यासाठी तिने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गाणीही गायली होती.