अयोध्येतील श्रीराम मंदिर असेल भारतातील दुसरे मोठे मंदिर

Published on
Updated on

येत्या पाच ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. सध्या या मंदिराचा आराखडा 67 एकर परिसराचा आहे; मात्र हे भव्य मंदिर तब्बल 108 एकर क्षेत्रात असावे, अशी योजना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून तयार करण्यात येत  आहे. असे जर झाले, तर क्षेत्रफळाच्या तुलनेत अयोध्येतील श्रीराम मंदिर जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे मंदिर असेल. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर 67 एकर परिसरात बनले तरी ते जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे मंदिर, तर भारतातील दुसरे मोठे मंदिर ठरणार आहे. भारताला जगात मंदिरांचा देश म्हणून ओळखण्यात येते; मात्र जगातील सर्वात मोठ्या पहिल्या 10 पैकी चार मंदिरे विदेशी भूमीवर आहेत. यातील एक कंबोडियात, एक अमेरिकेत आणि दोन इंडोनेशियात आहेत. क्षेत्रफळाच्या तुलनेत जगातील पहिल्या आठ मोठ्या मंदिरांची माहिती.

अंगकोर वाट मंदिर : कंबोडिया : 402 एकर

क्षेत्रफळाच्या द‍ृष्टीने कंबोडियातील अंगकोर येथील 'अंगकोर वाट' नामक मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर ठरते. हे तब्बल 402 एकर परिसरात पसरलेले आहे. याची निर्मिती 12 व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी केली असल्याचे म्हटले जाते.

• श्री स्वामीनारायण अक्षरधाम, न्यू जर्सी, अमेरिका : 163 एकर

उत्तर अमेरिकेतील न्यू  जर्सी शहरामध्ये 'श्री स्वामीनारायण अक्षरधाम' हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेच्या वतीने उभारण्यात आले आहे. ते 2014 मध्ये भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. हे मंदिर तब्बल 163 एकर परिसरात बांधण्यात आले आहे.

• श्री रंगनाथ स्वामी मंदिर, तामिळनाडू, 156 एकर

भारतातील तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात तिरुचिरापल्ली शहरात 'श्री रंगनाथस्वामी मंदिर' आहे. क्षेत्रफळाच्या द‍ृष्टीने विचार केल्यास हे मंदिर भारतातील सर्वात मोठे आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे मंदिर आहे. तसे पाहिल्यास भगवान विष्णूचे हे मंदिर तब्बल 156 एकर परिसरात पसरले असून त्याची निर्मिती 8 ते 9 व्या शतकात झाल्याचे मानले जाते.

श्रीराम मंदिर :  अयोध्या : 108 एकर (प्रस्तावित)

येत्या 5 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा होणार आहे. हे मंदिर सुमारे 108 एकर परिसरात उभारण्याचा प्रस्ताव आहे. असे झाले, तर हे श्रीरामाचे मंदिर भारतातील दुसरे, तर जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे मंदिर असेल.

छतरपूर मंदिर : नवी दिल्ली : 69 एकर

भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये 1974 मध्ये संत नागपाल यांनी 'छतरपूर' मंदिराची निर्मिती केली. उल्लेखनीय म्हणजे हे मंदिर पूर्णपणे संगमरवराचे असून ते 68 एकर परिसरात पसरले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते.

अक्षरधाम मंदिर : नवी दिल्ली : 59 एकर

भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये 'स्वामी नारायण अक्षरधाम' मंदिर हे स्वामीनारायण संस्थेच्या वतीने सुमारे 59 एकर परिसरात उभारण्यात आले आहे. 2005 मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खोलण्यात आले होते. मंदिराची निर्मिती सुमारे 3 हजार स्वयंसेवक आणि सात हजार कलाकारांनी मिळून केली आहे.

बेसाकी मंदिर : इंडोनेशिया : 49 एकर

इंडोनेशियातील बाली येथे 'बेसाकी' मंदिर आहे. ही एक मंदिरांची साखळीच आहे. ही मंदिरे सहा स्तरांत बांधण्यात आली आहेत. या मंदिरांचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. असे म्हटले जाते, की या मंदिराची निर्मिती 13 व्या शतकात करण्यात आली आहे. हे मंदिर सुमारे 49 एकर परिसरात पसरले आहे.

बेलूर मठ, रामकृष्ण मंदिर : हावडा : 40 एकर

भारताचे एक महत्त्वाचे राज्य असलेल्या पश्‍चिम बंगालमधील हावडा येथे बेलूर मठ रामकृष्ण मंदिर आहे. सुमारे 40 एकर परिसरात पसरलेले हे मंदिर रामकृष्ण मिशनचे मुख्यालयसुद्धा आहे. याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. हे मंदिर हुगली नदीच्या तीरावर असून याची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news