

नवी दिल्ली : जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा मेंदू झोन आऊट (ध्यान न लागणे) का होतो, यामागचे कारण एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. झोप न मिळाल्यास आपला मेंदू जागेपणीच झोपेत जाण्यासारखे वर्तन करू लागतो. नेचर न्यूरोसायन्स या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या शोधामुळे झोपेच्या कमतरतेने होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम स्पष्ट झाले आहेत.
रात्रभर जागे राहिल्यानंतर (स्लीप डिप्रिव्हड) व्यक्तीच्या मेंदूतील स्कॅनमध्ये रक्ताचा प्रवाह (ब्लड फ्लो) आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुईडचा (सीएसएफ) प्रवाह या संशोधनात तपासण्यात आला. सीएसएफ हा मेंदू आणि मणक्याभोवती (स्पायनल कॉर्ड) असलेला एक द्रव आहे, जो मेंदूची टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट (वेस्ट डिस्पोजल) लावणारी प्रणाली चालवतो. जेव्हा एखादी व्यक्ती थकव्यामुळे झोन आऊट होते, तेव्हा हा सीएसएफ मेंदूतून बाहेर फेकला जातो (फ्लशडआऊट). जेव्हा व्यक्ती पुन्हा सावध होते, तेव्हा हा द्रव मेंदूत परत येतो. संशोधकांना असे आढळले की, थकव्यामुळे लक्ष कमी होणे, सीएसएफचा प्रवाह, रक्तप्रवाह आणि डोळ्यांच्या बाहुलीचा आकार (पपिल साईज) यांमध्ये मोठे आणि एकाच वेळी बदल (इन टॅन्डम) होतात. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित संबंध यापूर्वी अज्ञात होता.
थकलेल्या लोकांच्या मेंदूमधील पॅटर्न, विशेषतः मंद मेंदू लहरी (स्लो बे्रन व्हेव्ह) आणि सीएसएफची मोठे स्पंदने (प्लस), नॉन-आरईएम झोपेच्या पहिल्या दोन टप्प्यांत (एन 1 आणि एन 2) आढळणार्या पॅटर्नसारखे होते. थकलेला मेंदू जागेपणीच झोपेसारख्या अवस्थेत जात असल्याचे हे संकेत आहेत. लक्ष कमी होणे (लॅप्स इन अटेन्शन) म्हणजे झोपेच्या प्रक्रियेची सुरुवात होणे; परंतु पूर्ण झोप लागण्यापूर्वीच ती प्रक्रिया थांबवणे. संशोधकांचे म्हणणे आहे की, भविष्यात या बदलांमुळे विषारी मेटाबॉलिक टाकाऊ पदार्थांचे (टॉक्सिक मेटॉबॉलिक वेस्ट ) मेंदूतून उत्सर्जन कसे होते, याचा अभ्यास केला जाईल.