अलास्कामध्ये पूर्णपणे गोल आकाराचे रहस्यमय विवर

The mysterious, perfectly round hole in Alaska
अलास्कामध्ये पूर्णपणे गोल आकाराचे रहस्यमय विवरPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेत अलास्कामध्ये सॅवोनोस्की क्रेटर नावाचे अनोखे विवर आहे. या विवराचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते जवळजवळ पूर्णपणे गोल आकाराचे आहे. नैॠत्य अलास्कामधील हा गोल खड्डा अनेक वर्षांपासून संशोधकांच्या कुतुहलाचा विषय बनलेला आहे. तो इतका ‘परफेक्ट’ गोल कसा आहे, याचे संशोधकांना गूढ वाटते. त्याबाबतचे जिओलॉजिकल पुरावे सापडलेले नसल्याने हे गूढ अद्याप कायमच आहे.

अर्थात, ही कुण्या एलियनची निर्मिती नाही की त्यामध्ये काही ‘अलौकिक’ असा काही भाग आहे. या गोलाकाराची काही वैज्ञानिक कारणे सांगितली जात असतात. हा खड्डा 1600 फूट आकाराचा असून, तो 360 फूट खोल आहे. पावसाच्या पाण्याने तसेच वितळलेल्या बर्फाने तो निम्मा भरलेला आहे. आकाशातून तो पाहिला की, स्पष्टपणे हे जाणवते की हा खड्डा एखाद्या उल्केच्या धडकेतून निर्माण झालेला असावा. त्यामुळेच त्याला ‘इम्पॅक्ट क्रेटर’मध्ये गणले जात असते. अशी विवरे शक्यतो गोलाकार आणि खोल असतात. सॅवोनोस्कीमध्ये त्याची सर्व लक्षणे आढळतात. मात्र, याठिकाणी पृथ्वीला एखाद्या उल्केची धडक झाली होती, याचे भूगर्भीय पुरावे सापडलेले नाहीत. त्यासाठी 1960 व 1970 च्या दशकात अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये असे पुरावे मिळवण्यात अपयशच आले. तिथे उल्केचे तुकडे किंवा विवरातील धक्का बसलेल्या दगडांचे अवशेष मिळू शकले नाहीत. तसे काही मिळाले असते तर हे ‘इम्पॅक्ट क्रेटर’ आहे हे निर्विवादपणे सिद्ध झाले असते. धडकल्यानंतर इतरत्रही असे तुकडे विखरून पडत असतात. तसे ते आजूबाजूलाही आढळले नाहीत. हा ‘व्होल्कॅनिक मार’चाही परिणाम असावा, असे काहींना वाटते. पृथ्वीच्या कठीण पृष्ठभागातून मॅग्मा वर येऊन तो भूजलापर्यंत पोहोचतो. या मॅग्मामुळे पाणी उकळते व त्याच्या वाफेच्या दाबाने जमीन फोडून ते बाहेर येते. त्यामुळेही असे खड्डे पडू शकतात. अलास्कामध्येच असे एक व्होल्कॅनिक मार असून, त्याचे नाव ‘युकिनरेक मार’ असे आहे. 1977 मध्ये दहा दिवसांच्या उद्रेकानंतर ते बनले होते. ते 330 फूट खोलीचे आहे. तेही सध्या अंशतः पाण्याने भरलेले आहे. मात्र, अशा ज्वालामुखीय हालचाली सॅवोनोस्की क्रेटरच्या ठिकाणी झालेले पुरावे नाहीत. तसेच या खड्ड्यामध्ये मॅग्माचीही चिन्हे दिसलेली नाहीत. त्यामुळे याबाबत अद्यापही संभ्रमच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news