

सिडनी : जगातील सर्वात धोकादायक पक्षी कोणता, या प्रश्नावर बरीच उत्तरे येऊ शकतील. मात्र, त्यातही अगदी एखादा मनुष्य समोर आल्यानंतर मनुष्याच्या जीवालाही धोका निर्माण करणारा एक पक्षी म्हणजे कॅसोवरी. असे म्हटले जाते की, हा पक्षी काही क्षणात कोणत्याही व्यक्तीचा जीव घेऊ शकतो.
जगातील सर्वात धोकादायक पक्षी म्हणून ओळखला जाणारा कॅसोवरी ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो. या पक्षाच्या हल्ल्यात मानवाला जीवही गमवावा लागू शकतो. हा जगातील तिसरा सर्वात मोठा पक्षी म्हणूनही नावारूपास आला आहे. शहामृग आणि इमू नंतर सर्वात मोठा पक्षी म्हणून या पक्षाचा नंबर आहे. कॅसोवरी हा डायनासोरचा वंशज. लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या मते, कॅसोवरी हा पक्षी चमकदार निळे डोके असलेल्या डायनासोरचा वंशज आहे. त्याची नखे खंजिरासारखी आहेत, जे पोटावर प्राणघातक हल्ला करतात. त्यामुळे एखादा व्यक्ती गंभीर जखमी होऊ शकतो. कॅसोवरीचे वजन 70 किलोपर्यंत असते, त्यामुळे तो उडू शकत नाही. ते त्यांच्या अंड्यांचे रक्षण करतात, त्यामुळे घरटे सोडत नाहीत.