

वॉशिंग्टन ः एका नवीन संशोधनानुसार, मेगालोडॉन शार्क पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक मोठे असू शकतात. हे भव्य शार्क तब्बल 80 फूट (24.3 मीटर) लांब वाढले असावेत, जे पूर्वीच्या 65 फूट (19.8 मीटर) लांबीच्या अंदाजापेक्षा 15 फूट (4.5 मीटर) जास्त आहे. संशोधकांच्या मते, या शार्क पूर्वीच्या अंदाजांपेक्षा अधिक सडपातळही असू शकतात.
सीवर्ल्ड सॅन दिएगोमधील शिक्षणतज्ज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक फिलिप स्टर्न्स यांनी सांगितले की, पूर्वी मेगालोडॉनच्या लांबीचा अंदाज प्रामुख्याने त्याच्या दातांच्या आधारे काढला जात असे. याआधी शास्त्रज्ञांनी या प्रजातीची लांबी 18 ते 20 मीटर (59-65 फूट) असल्याचे गृहित धरले होते. मेगालोडॉन शार्क सुमारे 2 कोटी ते 36 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या समुद्रांवर राज्य करत होते. मात्र, त्यांच्या पूर्ण सांगाड्याचे एकही जीवाश्म कधी सापडलेले नाही. या शार्कबद्दलची माहिती त्यांच्या कणा, शल्क आणि विशाल दातांच्या जीवाश्मांवरून मिळते. आतापर्यंत सापडलेले सर्वात मोठे जीवाश्म 36 फूट (11 मीटर) लांब आहे, जे या शार्कच्या मुख्य शरीराच्या भागात असावा. ‘पॅलियोन्टोलॉजिया इलेक्ट्रोनिका’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी 150 हून अधिक जिवंत आणि नामशेष झालेल्या शार्क प्रजातींशी तुलना करून मेगालोडॉनच्या आकाराचा अंदाज लावला. संशोधकांनी आधुनिक आणि प्राचीन शार्कच्या शरीराच्या तुलनेत मेगालोडॉनच्या 36 फूट लांब कण्यावरून अंदाज लावला, की त्याचे डोके 6 फूट (1.8 मीटर) आणि शेपूट 12 फूट (3.6 मीटर) लांब असू शकते. त्यामुळे या नमुन्याची एकूण लांबी 54 फूट (16.4 मीटर) असू शकते. मात्र, आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा कण 9 इंच (23 सेंटीमीटर) व्यासाचा आहे, जो पूर्वीच्या 54 फूट लांबीच्या शार्कच्या कण्यापेक्षा 3 इंच (7.6 सेमी) मोठा आहे. त्यामुळे या मोठ्या कण्यावरून मेगालोडॉनची एकूण लांबी 80 फूट असावी, असे संशोधकांचे मत आहे. संशोधनात असेही आढळले की, मेगालोडॉन मादी पिल्लांना थेट जन्म देत असे आणि नवजात पिल्लांची लांबीच 12 ते 13 फूट (3.6 ते 3.9 मीटर) असू शकत होती! म्हणजेच, हे पिल्लूही आधुनिक शार्कपेक्षा मोठेच असायचे. या नव्या संशोधनामुळे मेगालोडॉनच्या खर्या आकाराविषयीचे रहस्य आणखी उलगडले आहे आणि हे महासागरातील सर्वात भव्य शिकारी होते, याची खात्री पटली आहे.