

वॉशिंग्टन : अँडी वेयर यांच्या लोकप्रिय कादंबरी ‘द मार्शियन’ मध्ये 2035 सालापर्यंत ‘नासा’ मंगळावर तीन मानवी मोहिमा राबवेल, पृथ्वीवर परत येण्याच्या तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवेल आणि चीनच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेशी (CNSA) सहकार्य करेल, असं भाकीत केलं आहे. या कथेच्या हॉलीवूड चित्रपट रूपांतराला 2015 मध्ये प्रदर्शित होऊन 10 वर्षं झाली आहेत आणि आपण आता त्या काल्पनिक भविष्यकाळापासून 10 वर्षं मागे आहोत. या ‘मध्यबिंदू’वर उभं राहून पाहिलं तर मंगळावरील संशोधन हे ‘द मार्शियन’ मध्ये दाखवलेल्या चित्रापेक्षा बरंच वेगळं आहे, जास्त संशोधन, पण जास्त वादही!
मी एक ग्रहशास्त्रज्ञ (Planetary Geologist) असून, नासाच्या मंगळविषयक मोहिमांशी जोडलेली आहे आणि त्यामुळे मंगळ संशोधन व धोरण यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवते. 2010 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ धोरणाने 2030च्या दशकात मंगळावर मानवी मोहिमा पाठवण्याचं लक्ष्य जाहीर केलं होतं. मात्र, 2017 मध्ये व्हाईट हाऊसच्या स्पेस पॉलिसी डायरेक्टिव्ह 1 नुसार नासाने पुन्हा प्रथम चंद्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून ‘आर्टेमिस मिशन’ चा जन्म झाला, असे संशोधिका एरी कोपेल यांनी म्हटले आहे. मानवी मंगळ मोहिमेच्या संकल्पना लोकप्रिय झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात नासाचं मंगळावर माणूस उतरवण्याचं नियोजन अजूनही अतिशय अस्थिर आहे.
मागील 10 वर्षांत मानवी मोहिमांपेक्षा रोबोटिक मोहिमांनीच मंगळावरील संशोधनात भर घातली आहे आणि मानवाच्या कल्पनाशक्तीलाही चालना दिली आहे. 2015 पासून सॅटेलाईट्स आणि रोव्हर्सच्या माध्यमातून मंगळाच्या हवामानात झालेल्या बदलांबाबत नवे द़ृष्टिकोन सापडले आहेत. मंगळ हा पृथ्वीचा शेजारी असल्यानं त्यावरील हवामान परिवर्तन हे आपल्या सौरमालेतील इतर प्रक्रियांशी जोडलेलं आहे, खासकरून त्या काळातल्या, जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टीचा प्रारंभ होत होता. त्यामुळे मंगळ हे ‘आपण कुठून आलो?’ आणि ‘आपण एकटे आहोत का?’ यासारख्या मूलभूत प्रश्नांच्या उत्तरांसाठी एक महत्त्वाचं केंद्र ठरलं आहे.
अपॉर्च्युनिटी, क्युरिऑसिटी आणि पर्सिव्हरन्स या रोव्हर्सनी मंगळावरील डझनावधी मैल प्रवास करत अनेक थर असलेल्या खडकांच्या अभ्यासातून मंगळाच्या भूतकाळाचा तपशीलवार इतिहास समोर आणला आहे. केकच्या थरांसारख्या या खडकांच्या थरातून पर्यावरणीय बदलांची चित्रं उलगडली आहेत आणि हे बदल पृथ्वीवरील वर्तमान हवामान बदलांपेक्षा अनेक पटींनी मोठे आहेत. एकेकाळी मंगळवर ज्वालामुखी, हिमनद्या, सरोवरे आणि वाहणार्या नद्या असायच्या, म्हणजेच अगदी पृथ्वीच्या सुरुवातीच्या अवस्थेसारखं वातावरण. पण, नंतर त्याच्या केंद्रभागाचं थंड होणं, चुंबकीय क्षेत्राचा लोप, आणि वातावरणाचं हळूहळू नष्ट होणं, यामुळे मंगळाचं रूपांतर एका रखरखीत, शुष्क ग्रहात झालं. त्याच्या पृष्ठभागावर आजही हे बदल दिसून येतात. भूपृष्ठावरील रचना, खडकांच्या थरांच्या मालिका आणि खनिजांचे मिश्रण यामधून हे दिसते.