अव्यवस्थित हायड्रोजनमुळे दोन आकाशगंगांची टक्‍कर! | पुढारी

Published on
Updated on

नवी दिल्‍ली : अनेक ग्रह-तार्‍यांनी बनलेल्या आकाशगंगा ब्रह्मांडाच्या या अफाट पसार्‍यात विखुरलेल्या आहेत. आपली ग्रहमालिका 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेचा एक भाग आहे. अन्यही आकाशगंगांचा खगोलशास्त्रज्ञांकडून सातत्याने अभ्यास केला जात असतो. आता दोन भारतीय दुर्बिणींच्या आधारे याबाबत नवे संशोधन करण्यात आले आहे. आकाशगंगांचा विचित्र व्यवहार हा त्यांच्यामधील अव्यवस्थित हायड्रोजनमुळे होतो असे यामधून दिसून आले. याच कारणामुळे दोन आकाशगंगांची अलीकडेच टक्‍करही झालेली आहे.

विज्ञान मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. या संशोधनात आढळले की ब्रह्मांडातील अब्जावधी आकाशगंगांमध्ये मोठ्या संख्येने अशा छोट्या आकाशगंगाही आहेत ज्यांचे द्रव्यमान 'मिल्की वे' या आपल्या आकाशगंगेच्या तुलनेत शंभरपटीने कमी आहे. त्यापैकी अनेक आकाशगंगा 'ड्वॉर्फ गॅलेक्सी' म्हणजेच 'खुजा आकाशगंगा' म्हणून ओळखल्या जातात. त्या मोठ्या आकाशगंगांच्या तुलनेत कमी वेगाने तार्‍यांची निर्मिती करतात. या घडामोडी दहा लाख वर्षांपेक्षा अधिक काळ चालत नाहीत. आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान (एआरआयईएस) चे वैज्ञानिक डॉ. अमितेश उमर आणि त्यांचे माजी विद्यार्थी सुमित जैस्वाल यांनी नैनितालजवळील 1.3 मीटरची 'देवस्थल फास्ट ऑप्टिकल टेलिस्कोप' आणि जायंट वेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून अनेक आकाशगंगांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हायड्रोजन कोणत्याही तार्‍याच्या निर्मितीसाठी गरजेचा घटक आहे. वेगाने व मोठ्या प्रमाणात तार्‍यांच्या निर्मितीसाठी हायड्रोजनच्या उच्च घनत्वाची गरज असते. अनेक तीव्र तारा बनवणार्‍या खुजा आकाशगंगांच्या 1420.40 मेगाहर्ट्ज प्रतिमांमधून हा संकेत मिळतो की या आकाशगंगांमध्ये हायड्रोजन अव्यवस्थित आहे. अशा अनियमित हायड्रोजनमुळेच अलीकडे दोन आकाशगंगांची धडकही झालेली आहे.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news