नवी दिल्ली : कोरोनामुळे कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला. वुहानमधून पसरलेल्या या व्हायरसने तमाम लोकांचे जीवनच बदलून टाकले. कोट्यवधी लोकांची नोकरी गेली. अशा संकटकाळात बेरोजगार लोक पुन्हा नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, एका अशा मुक्या प्राण्याने नोकरी मिळविली, ते वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. कारण ही नोकरी चक्क भटक्या मांजराने मिळविली आणि तीसुद्धा सुरक्षारक्षकाची.
प्राचीन काळापासून मानवाने आपल्या स्वार्थासाठी अथवा सेवेसाठी सातत्याने प्राण्यांचा वापर केला आहे. यामध्ये गाय, बैल, कुत्रा, घोडा अशा अनेक प्राण्यांचा समावेश करता येईल. मात्र, कुत्र्याचा अपवाद वगळता दुसरा कोणताही प्राणी सुरक्षारक्षकाचे काम आतापर्यंत करू शकलेला नाही. मात्र, यास आता एक ऑस्ट्रेलियन मांजर अपवाद ठरले आहे. ऑस्ट्रेलियातील रिचमंड शहरातील एपवर्थ हॉस्पिटलमध्ये हे मांजर सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत आहे. या हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षकांनी या मांजराला आपल्या पथकात सहभागी करवून घेतले आहे. या नोकरदार मांजराचे नाव एलवूड असे आहे. उल्लेखनीय म्हणजे हॉस्पिटलचा सुरक्षारक्षक म्हणून अधिकृत ओळखपत्रही या मांजराच्या गळ्यात अडकवण्यात आले आहे.