

राणीखेत : देवभूमी उत्तराखंडच्या राणीखेत येथील वनक्षेत्रात थायलंडचा राष्ट्रीय पक्षी ‘सियामीज फायरबॅक’ आढळून आला आहे. या सुंदर आणि दुर्मीळ पक्ष्याच्या दर्शनाने निसर्ग आणि पक्षीप्रेमी आश्चर्यचकित आणि उत्साहित झाले आहेत. कुमाऊं मंडळ विकास निगमाशी संबंधित असलेले पक्षीप्रेमी सुरेंद्र सिंह जलाल यांनी या सुंदर पक्ष्याला आपल्या कॅमेर्यात कैद केले आहे.
नुकतेच बिनसर महादेव मंदिरापासून सुमारे 600 मीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात हा पक्षी दिसला. या दुर्मीळ द़ृश्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जलाल यांनी सांगितले की, ‘या दुर्मीळ पक्ष्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहून ते खूप ‘रोमांचित’ झाले आहेत. या द़ृश्याचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, ‘यामुळे पक्षी निरीक्षणासाठी नवीन दालनं उघडली आहेत.’ जलाल पुढे म्हणाले, ‘जेव्हा मी पहिल्यांदा बिनसर महादेवच्या पुढे जंगलात या पक्ष्याला पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
सत्य समोर असताना त्याचे छायाचित्र काढणे हा एक अद्भुत आणि अविस्मरणीय अनुभव होता. या दुर्मीळ पक्ष्याचे येथे दिसणे हे आपल्या पर्वतीय प्रदेशातील जैवविविधतेसाठी एक आनंदाची बाब आहे.’ डोंगराळ भागात या विदेशी पक्ष्याचे अस्तित्व हे या प्रदेशातील मजबूत जैवविविधता आणि उत्तम पर्यावरणीय संतुलनाचे संकेत देते. हे स्थानिक वन्यजीव आणि नैसर्गिक अधिवासांची गुणवत्ता दर्शवते. संवर्धन संस्थांनी सध्या या पक्ष्याला ‘सर्वात कमी चिंतेचा’ (Least Concern) म्हणून वर्गीकृत केले असले तरी, जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यांसारख्या धोक्यांमुळे त्याच्या नैसर्गिक अधिवासाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
वन विभागाच्या सूत्रांनुसार, सियामीज फायरबॅक सामान्यतः थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनामच्या दमट, सदाहरित जंगलांमध्ये आढळतो. नर पक्ष्याची लांबी 75-80 सेमी आणि मादीची लांबी 55-60 सेमी असते. त्यांचे वजन 1.2 ते 1.5 किलोग्रॅमपर्यंत असते. त्याचे तपकिरी शरीर, चमकदार निळे-नारंगी पंख, लाल चोच आणि सुंदर चाल त्याला अत्यंत आकर्षक बनवते. मादीचा रंग तपकिरी असून तिची चोच लाल आणि पाय गडद लाल रंगाचे असतात. सूर्यप्रकाशात त्याच्या पंखांची धातूसारखी चमक आकर्षक दिसते.