

बँकॉक : जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या अनोख्या भौगोलिक रचनेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, समुद्राच्या पाण्यावर संपूर्ण गावच तरंगत असल्याचा विचार कधी केला आहे का? थायलंडमधील ‘फांग गा’ (Phang Nga) उपसागरात वसलेले ‘को पांयी’ (Ko Panyi) हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आश्चर्यकारक तरंगणारे गाव म्हणून ओळखले जाते. पाण्यावर वसलेले हे गाव पाहायला दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात.
या गावाचा इतिहास अतिशय रंजक आहे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंडोनेशियातून आलेल्या भटक्या मलय कोळी कुटुंबांनी या गावाची उभारणी केली. त्या काळात परदेशी नागरिकांना थायलंडमध्ये जमीन खरेदी करण्यास कायदेशीर बंदी होती. यावर अनोखी युक्ती शोधत त्यांनी समुद्रात खोटे (Stilts) रोवून पाण्यावरच आपली घरे बांधायला सुरुवात केली. काळाच्या ओघात या वस्तीचा विस्तार झाला आणि आज येथे ३०० हून अधिक कुटुंबे (सुमारे १,६०० लोक) राहतात. ‘को पांयी’ गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, येथील दैनंदिन जीवन संपूर्णपणे पाण्यावरच चालते. जमिनीचा एक तुकडाही न वापरता या गावाने सर्व आधुनिक सुविधा उभारल्या आहेत.
पाण्यावर तरंगणारी शाळा : गावातील मुलांच्या शिक्षणासाठी पाण्यावर तरंगणारी भव्य शाळा उभारण्यात आली आहे. तरंगणारे फुटबॉल मैदान : या गावातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पाण्यावर बांधलेले लाकडी फुटबॉल मैदान! १९८६ च्या विश्वचषकानंतर गावातील मुलांनी जुन्या लाकडाच्या फळ्या एकत्र करून हे मैदान तयार केले होते. आज हे मैदान जगातील सर्वात अनोख्या क्रीडांगणांपैकी एक मानले जाते. बाजार आणि उपाहारगृहे : पर्यटकांसाठी येथे पाण्यावर तरंगणारी सी-फूड रेस्टॉरंटस् आणि हस्तकलेच्या वस्तूंचे बाजार उपलब्ध आहेत. आजच्या काळात या गावात वीज, इंटरनेट आणि आधुनिक सुविधा पोहोचल्या आहेत. गावकऱ्यांचे मुख्य उत्पन्न आता केवळ मासेमारीपुरते मर्यादित नसून पर्यटन हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. भरती आणि ओहोटीच्या वेळी समुद्राच्या लाटांवर तरंगणारे हे गाव मानवी कल्पकता आणि संघर्षाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते.