

बर्मिंगहॅम : सुमारे 12.5 कोटी वर्षांपूर्वी, आजच्या थायलंडमधील नद्यांच्या काठी एक महाकाय डायनासोर वावरत असे. पिकअप ट्रकपेक्षाही लांब असलेला हा हिंस्र प्राणी प्रामुख्याने मासे खाऊन आपला उदरनिर्वाह करत असे. संशोधकांनी नुकताच या डायनासोरच्या जीवाश्माचा शोध लावला असून, आशियामध्ये आढळलेल्या ‘स्पिनोसॉरिड’ (Spinosaurid) प्रजातीतील हा आतापर्यंतचा सर्वात पूर्ण नमुना मानला जात आहे.
संशोधकांना या डायनासोरचा कणा, पेल्विस (कंबरेचा भाग) आणि शेपटीचे भाग सापडले आहेत. या डायनासोरची लांबी सुमारे 25 फूट (7 ते 8 मीटर) असावी, असा अंदाज आहे. स्पिनोसॉरिड हे दोन पायांवर चालणारे शिकारी होते. त्यांचे तोंड मगरीसारखे लांबट, दात टोकदार आणि पाठीवर डोलकाठीसारखा भाग असे. या डायनासोरला अद्याप अधिकृत वैज्ञानिक नाव देण्यात आलेले नाही; परंतु ज्या ठिकाणी हे अवशेष सापडले त्यावरून संशोधकांनी त्याला ‘सॅम रान स्पिनोसॉरिड’ असे टोपणनाव दिले आहे. थायलंडमधील महासारखाम विद्यापीठाचे प्राध्यापक अदुन समाथी यांनी या संशोधनाची माहिती दिली.
त्यांच्या मते, ‘या शोधामुळे आशियातील स्पिनोसॉरिड डायनासोरचे स्वरूप आणि त्यांची उत्क्रांती समजून घेण्यास मदत होईल. तसेच, दक्षिण-पूर्व आशियामध्ये डायनासोरची विविधता पूर्वीच्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त होती, हे देखील यातून स्पष्ट होते.’ हे अवशेष सर्वप्रथम 2004 मध्ये सापडले होते; मात्र प्रदीर्घ अभ्यासानंतर त्याचे तपशील आता समोर आले आहेत. हा डायनासोर उत्तर आफ्रिकेत आढळणार्या 50 फूट लांब ‘स्पिनोसॉरस’ ( Spinosaurus) या प्रजातीशी साधर्म्य दर्शवतो, जो पाण्यात पोहणारा जगातील सर्वात मोठा मांसभक्षी डायनासोर मानला जातो.
संशोधनानुसार, सॅम रान स्पिनोसॉरिडची पाठीवरील हाडे ही आफ्रिकेतील स्पिनोसॉरसपेक्षा लहान आहेत, तर लाओसमध्ये आढळणार्या ‘इचिथ्योव्हेनेटर’ (Ichthyovenator) पेक्षा ती वल्ह्यासारख्या आकाराची (Paddle- like) आहेत. या वैशिष्ट्यांमुळे हा डायनासोर इतर प्रजातींपेक्षा वेगळा ठरतो. हे संशोधन 12 नोव्हेंबर रोजी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे आयोजित ‘सोसायटी ऑफ व्हर्टेब्रेट पॅलेओन्टोलॉजी 2025’च्या वार्षिक सभेत सादर करण्यात आले.