Terrifying Human Figurine | जपानमधील १,५०० वर्षे जुन्या थडग्यात सापडली ‘भीतिदायक’ मानवी मूर्ती

Terrifying Human Figurine | जपानमधील १,५०० वर्षे जुन्या थडग्यात सापडली ‘भीतिदायक’ मानवी मूर्ती
Terrifying Human Figurine | जपानमधील १,५०० वर्षे जुन्या थडग्यात सापडली ‘भीतिदायक’ मानवी मूर्ती Terrifying Human Figurine |
Published on: 
Updated on: 

टोकियो : जपानमध्ये पाचव्या शतकातील एका प्राचीन दफनभूमीमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका मानवाच्या आकाराची अत्यंत गूढ आणि विशेष कलाकृती सापडली आहे. ही मातीची मूर्ती पाहून ती एकेकाळी थडग्याचे रक्षण करणाऱ्या एखाद्या महिला स्त्री पुजारीचे प्रतिनिधित्व करत असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

जपानच्या गुन्मा प्रांतीय सरकारच्या एका निवेदनातून ही माहिती समोर आली आहे. राजधानी टोकियोच्या वायव्येस असलेल्या ‘निशिकामिनोमिया’ (Nishikaminomiya) या पुरातत्वीय स्थळावर हा शोध लागला आहे. या ठिकाणी पुरातत्त्वशास्त्रज्ञांना ५ व्या आणि ६ व्या शतकातील ‘कोफून’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळपास डझनभर दफनभूमी आढळल्या आहेत. जपानच्या इतिहासातील इ.स. ३०० ते ७१० पर्यंतच्या या काळाला ‘कोफून काळ’ म्हटले जाते. या काळातील अनेक थडग्यांवर ‘हानिवा’ नावाची सिलिंडरच्या आकाराची मातीची शिल्पे ठेवली जात असत. मृत व्यक्तीला अर्पण म्हणून ही शिल्पे वापरली जात आणि बऱ्याचदा असे मानले जात असे की, त्यात मृतांचे आत्मे वास करतात.

आताच नव्याने सापडलेली ‘हानिवा’ मूर्ती सुमारे १६ इंच (४० सेंटीमीटर) उंच आहे; परंतु तिचे केवळ डोके आणि धडच शिल्लक असल्याने ती मूळ स्वरूपात याहून खूप मोठी असणार. सुमारे १४५ फूट (४५ मीटर) व्यास असलेल्या एका महाकाय दफनभूमीभोवतालच्या खंदकात ही मूर्ती सापडली आहे. या निवेदनात म्हटल्यानुसार, सुरुवातीला ही मूर्ती थडग्यात सापडलेल्या एका बोटीच्या आकाराच्या शवपेटीजवळ ठेवली असण्याची दाट शक्यता आहे, जी कालांतराने घसरत घसरत खंदकात येऊन पडली असावी. तज्ज्ञांच्या मते, ही ‘हानिवा’ मूर्ती ‘मिको’ किंवा ‘श्राईन मेडन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका महिला शमनचे प्रतिनिधित्व करते. शिंतो धर्मात या महिला पुजारी मानवी आणि आध्यात्मिक जगतामध्ये दुवा साधण्याचे काम करतात. कोफून काळात या ‘मिको’ अत्यंत महत्त्वाचे अंत्यसंस्कार विधी पार पाडत असत आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करत असत.