Brain Monitoring Device | मेंदूची स्थिती सांगणारे छोटे डिव्हाईस ‘टेम्पल’

Brain Monitoring Device |
Brain Monitoring Device | मेंदूची स्थिती सांगणारे छोटे डिव्हाईस ‘टेम्पल’
Published on
Updated on

नवी दिल्ली : फिटनेस ट्रॅकिंगच्या जगात आतापर्यंत स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडचेच वर्चस्व राहिले आहे, परंतु लवकरच एका नवीन गॅझेटची एंट्री होणार आहे. झोमॅटो आणि एटर्नलचे संस्थापक दीपिंदर गोयल आता थेट मेंदूचे रहस्य उलगडणारे एक अनोखे गॅझेट लाँच करणार आहेत. या गॅझेटचे नाव ‘टेम्पल’ असे आहे. आकाराने अत्यंत लहान असलेल्या या गॅझेटची क्षमता खूप जास्त आहे. दीपिंदर गोयल यांनी खुलासा केला आहे की, ‘टेम्पल’ची नवीन आवृत्ती पूर्वी दाखवलेल्या मॉडेलपेक्षा निम्म्याहून कमी आकाराची आहे. विशेषतः मेंदूची कार्यपध्दत समजून घेण्यासाठी हे छोटेसे उपकरण बनवण्यात आले आहे.

दीपिंदर गोयल यांनी दावा केला आहे की, आकाराने हे बाजारातील सर्वात लहान वेअरेबल डिव्हाईस आहे आणि आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली आवृत्ती आहे. याच्या ‘लिमिटेड लाँच एडिशन’ची प्री-ऑर्डर बुकिंग लवकरच सुरू होणार असून, २०२६ च्या अखेरपूर्वी त्याची डिलिव्हरी (शिपिंग) सुरू करण्याचे नियोजन आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एका पॉडकास्ट दरम्यान दीपिंदर गोयल यांच्या कपाळाच्या एका बाजूला हे छोटे गॅझेट लावलेले दिसले होते, तेव्हा हे वेअरेबल पहिल्यांदा चर्चेत आले होते. याशिवाय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू देखील ‘टेम्पल’ वापरताना दिसून आली होती. हे डिव्हाईस मानवी शरीराची चयापचय स्थिती रिअल-टाईममध्ये मोजेल, असा दावा कंपनीने केला आहे. हे डिव्हाईस कान आणि कपाळाच्या मध्यभागी असलेल्या जागेवर (कनपटी) चिकटवले जाते. दीपिंदर गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत लिहिले आहे की, हे गॅझेट लोकांचे आयुष्य बदलून टाकेल. चालू वर्षाच्या मे महिन्यात गोयल यांनी सांगितले होते की, १०० ‘टेम्पल’ डिव्हाईस शिपिंगसाठी तयार आहेत, जे ॲथलीट, शास्त्रज्ञ, संस्थापक, डॉक्टर, क्रिएटर्स आणि स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना दिले जातील.

कसे काम करते ‘टेम्पल’?

स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड केवळ हृदयाचे ठोके, पावले आणि शारीरिक हालचाली ट्रॅक करतात. मात्र, दीपिंदर यांच्या मते, ‘टेम्पल’ची रचना मेंदूच्या कार्यपद्धतीला सखोलपणे समजून घेण्यासाठी करण्यात आली आहे. हे डिव्हाइस मेंदूतील रक्ताचा प्रवाह रिअल-टाईममध्ये ट्रॅक करते आणि मेंदूच्या कार्याशी संबंधित इतर संकेत मोजते. यात ऑक्सिजन पातळी, कॉग्निटिव्ह लोड आणि एंट्रॉपीसारख्या डेटाचा समावेश आहे; जो वेगवेगळ्या हालचालींदरम्यान मेंदू आणि शरीर कशी प्रतिक्रिया देत आहे हे सांगतो. खेळाडूंनी किती कठोर सराव केला आहे हे जाणून घेण्याव्यतिरिक्त, हे गॅझेट मेंदूच्या संकेतांद्वारे थकवा, रिकव्हरी, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता (Focus) आणि झोप याबद्दल सखोल माहिती देऊ शकते.आतापर्यंत संशोधक प्रयोगशाळेत ज्या घटकांचे मोजमाप करत होते, ते घटक एका लहान वेअरेबल डिव्हाइसद्वारे दैनंदिन जीवनात उपलब्ध करून देणे हा ‘टेम्पल’चा मुख्य उद्देश आहे. दीपिंदर गोयल यांनी अद्याप ‘टेम्पल’च्या अंतिम किंमतीचा खुलासा केलेला नाही, परंतु एका वृत्तानुसार याची किंमत सुमारे ७२,००० रुपये असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news