

बोस्टन : मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या संशोधकांनी एक असे उपकरण विकसित केले आहे, जे हवेतील आर्द्रता शोषून घेते आणि काही मिनिटांत तिचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करते. ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली नैसर्गिक पाण्याचे स्रोत दुर्मीळ असलेल्या समुदायांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी भविष्यात उपयोगी ठरेल, अशी आशा टीमने व्यक्त केली आहे.
वातावरणातील पाणी संकलन (Atmospheric Water Harvesting - AWH) प्रणाली हवेतून ओलावा खेचून घेतात आणि त्याचे द्रवरूप पाण्यात संघनन (Condensation) करतात. यासाठी सामान्यतः दमट हवा थंड केली जाते किंवा ‘शोषक’ नावाच्या स्पंजसारख्या सामग्रीचा वापर केला जातो, जी पाण्याची वाफ शोषून घेते. पारंपरिक AWH उपकरणांमध्ये शोषकातून पाणी बाष्पीभवन करण्यासाठी सूर्यप्रकाशावर अवलंबून राहावे लागते, ज्यासाठी अनेक तास किंवा दिवस लागू शकतात. यामुळे ही उपकरणे कोरड्या, संसाधनांची कमतरता असलेल्या प्रदेशांमध्ये कमी उपयुक्त ठरतात.
‘एमआयटी’चे नवे तंत्रज्ञान : ‘एमआयटी’चे नवीन उपकरण मात्र शोषकातून आर्द्रता वेगळी करण्यासाठी अल्ट्रासोनिक लहरींचा वापर करते. संशोधकांच्या मते, त्यांचे अल्ट्रासोनिक प्रोटोटाईप केवळ बाष्पीभवनाच्या तुलनेत शोषलेले पाणी काढण्यात 45 पट अधिक कार्यक्षम आहे. या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि एमआयटीमधील प्रमुख संशोधन वैज्ञानिक स्वेतलाना बोरिस्किना यांनी सांगितले की, ‘वातावरणातून पाणी काढण्याचे मार्ग लोक शोधत आहेत. विशेषतः वाळवंटी प्रदेशांसाठी आणि ज्या ठिकाणी समुद्राचे खारे पाणी गोड करण्यासाठीचे पर्यायही उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी हे पाण्याचे मोठे स्रोत असू शकते.
आता आमच्याकडे पाणी त्वरित आणि कार्यक्षमतेने पुनर्प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. ’एमआयटी’च्या या द़ृष्टिकोनात अल्ट्रासाऊंड वापरला जातो, जो मानवी श्रवण मर्यादेपलीकडील 20 किलोहर्ट्झपेक्षा जास्त वारंवारतेवर प्रवास करतो. AWH उपकरणाच्या मध्यभागी एक सपाट सिरेमिक रिंग आहे, जी व्होल्टेज दिल्यावर कंप होते. शोषलेले पाणी आणि सामग्रीच्या पृष्ठभागामधील कमकुवत बंध तोडण्यासाठी उच्च-वारंवारतेचे स्पंद आदर्श असल्याचे संशोधकांना आढळले.
प्रमुख लेखक आणि ‘एमआयटी’ पदवीधर विद्यार्थी इकरा इफ्तेखार शुवो यांनी सांगितले की, ‘हे असे आहे की, पाणी लहरींसह नृत्य करत आहे आणि या लक्ष्यित अडथळ्यामुळे पाण्याचे रेणू सोडण्याची गती निर्माण होते आणि ते थेंबांच्या रूपात बाहेर पडताना दिसतात.’ संशोधकांनी वेगवेगळ्या आर्द्रता स्तरांवर सेट केलेल्या चेंबरमध्ये शोषक सामग्रीच्या नमुन्यांवर या उपकरणाची चाचणी केली. प्रत्येक चाचणीत, उपकरणाने केवळ काही मिनिटांत नमुने पूर्णपणे कोरडे केले.