

न्यूयॉर्क : ‘एआय’ स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी तंत्रज्ञान उद्योगाने यावर्षी विशेष चिप्स आणि डेटा सेंटर्सवर सुमारे 400 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. या विशेष चिप्स जुन्या होण्यापूर्वी त्या किती काळ टिकतील, याबद्दलच्या अटकळींमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. ‘एआय’चा फुगा फुटण्याच्या सततच्या भीतीमुळे आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा आता ‘एआय’च्या तेजीवर अवलंबून असल्याने, जेव्हा सत्य परिस्थिती समोर येईल तेव्हा ती अत्यंत भीषण आणि खर्चिक असू शकते, असा इशारा विश्लेषक देत आहेत.
चॅटजीपीटी मुळे सुरू झालेल्या ‘एआय’ लाटेपूर्वी, क्लाऊड कॉम्प्युटिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असे गृहीत धरत असत की, त्यांच्या चिप्स आणि सर्व्हर्स साधारणपणे सहा वर्षे टिकतील. परंतु, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पॉलिसीचे मिहीर क्षीरसागर म्हणतात की, वापर आणि झीज यासोबतच तांत्रिकद़ृष्ट्या जुने होण्याच्या प्रक्रियेमुळे सहा वर्षांचे गृहीतक टिकवून ठेवणे कठीण आहे. चिप निर्माते एनव्हिडियाहे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने नवीन आणि अधिक शक्तिशाली प्रोसेसर बाजारात आणत आहेत. आपली प्रमुख ब्लॅकवेल चिप लाँच केल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एनव्हिडीयाने जाहीर केले की, 2026 मध्ये रुबिन ही चिप येईल, जिची कार्यक्षमता 7.5 पटीने जास्त असेल.
आर्थिक सल्लागार संस्था डी. ए. डेव्हिडसनचे गिल लुरिया यांनी चेतावणी दिली की, या वेगामुळे चिप्स त्यांच्या बाजार मूल्याच्या 85 ते 90 टक्के मूल्य तीन ते चार वर्षांतच गमावतात. एनव्हिडीयाचे सीईओ जेन्सन हुआंग यांनी मार्चमध्ये स्वतः ही बाब स्पष्ट करताना सांगितले होते की, जेव्हा ब्लॅकवेल लाँच झाली, तेव्हा कोणालाही जुन्या पिढीची चिप नको होती. ‘एआय’ प्रोसेसर पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात निकामी होत आहेत. ते इतके गरम होतात की, कधीकधी उपकरणे जळून खाक होतात. मेटा कंपनीने त्यांच्या ललामा एआय मॉडेलवर केलेल्या अलीकडील अभ्यासात वार्षिक बिघाडाचे प्रमाण 9 टक्के असल्याचे आढळले आहे.
डेटा सेंटर्स उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. जर उपकरणे वारंवार बदलावी लागल्यामुळे या कंपन्या कमी नफा कमावताना दिसल्या, तर त्यांना भांडवल उभे करणे अधिक महाग पडेल. काही कंपन्यांनी चिप्सनाच तारण ठेवून कर्ज घेतले असल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे.