Quantum Computer : चीनने बनवला जगातील पहिला ‘ड्युअल-कोर’ क्वांटम कॉम्प्युटर

अचूकता आणि गती वाढणार असल्याचा दावा
Quantum Computer
Quantum Computer
Published on
Updated on

बीजिंग : एका चिनी कंपनीने जगातील पहिला ‘ड्युअल-कोर’ क्वांटम कॉम्प्युटर तयार केला असून, त्याचे अनावरण केले आहे. दोन स्वतंत्र ‘क्युबिट अरे’ एकाच मशिनमध्ये एकत्र करून हा कॉम्प्युटर तयार करण्यात आला आहे. यामुळे या प्रणालीची स्थिरता, कार्यक्षमता आणि त्रुटी सुधारण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, असा दावा याच्या संशोधकांनी केला आहे.

वुहानमधील ‘कॅस कोल्ड ॲटम टेक्नॉलॉजी’ या कंपनीने मे महिन्यात या नव्या उपकरणाची घोषणा केली आहे. चिनी सरकारी प्रसारमाध्यम ‘एसटी डेली’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या कॉम्प्युटरला ‘हॅनयुआन-२’ असे नाव देण्यात आले असून, ते अधिक अद्ययावत आणि स्केलेबल क्वांटम हार्डवेअरच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे.

कंपनीचे वरिष्ठ तज्ज्ञ गुई-गुओ गी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कॉम्प्युटर स्वतंत्रपणे नियंत्रित करता येणाऱ्या ‘न्यूट्रल-ॲटम अरे’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये रुबिडियम अणूंचे एकूण २०० क्युबिटस्‌ असलेले दोन क्वांटम अरे जोडण्यात आले आहेत. (यामध्ये १०० रुबिडियम-८७ अणू आणि १०० रुबिडियम-८५ अणूंचा समावेश आहे). हे दोन्ही कोअर्स समांतरपणे काम करू शकतात, ज्यामुळे कॉम्प्युटरची गती वाढते. तसेच गरज पडल्यास ‘एक मुख्य कोअर आणि एक उप-कोअर’ अशा रचनेतही ते काम करू शकतात. या विशेष डिझाईनमुळे सिंगल-कोर सिस्टीममधील अनेक जुन्या तांत्रिक अडचणी दूर होतील. विशेषतः कॉम्प्युटरची क्षमता वाढवणे आणि शेजारील क्युबिटस्‌मधील अंतर्गत हस्तक्षेप रोखणे आता शक्य होणार आहे. क्वांटम कॉम्प्युटर्स हे अत्यंत संवेदनशील आणि नाजूक असतात. तापमानातील बदल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप यामुळे या कॉम्प्युटर्सच्या क्युबिटस्‌ मध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे गणिते किंवा आकडेमोड चुकू शकते. या समस्येवर मात करण्यासाठी ‘हॅनयुआन-२’ ची रचना करण्यात आली आहे. संपूर्ण प्रणाली दोन परस्पर पूरक कोअर्समध्ये विभागल्यामुळे, हे दोन्ही कोअर्स एकमेकांच्या त्रुटी सुधारू शकतात आणि कामाची आपापसात विभागणी करू शकतात. यामुळे व्यत्यय कमी होऊन अचूकता वाढण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news