

लंडन : बिटनमध्ये राहणारी आणि अभिनयाचे शिक्षण घेत असलेली 21 वर्षीय विद्यार्थिनी हॅरियट ट्रेविट हिची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कर्करोगाच्या उपचारासाठी झालेल्या एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर, तिच्या खांद्यावरील टॅटू चक्क तिच्या जिभेवर आला आहे! हा केवळ एक वैद्यकीय चमत्कार नसून, हॅरियटच्या हिमतीचे एक मोठे उदाहरण मानले जात आहे.
उत्तर यॉर्कशायर येथील रहिवासी असलेल्या हॅरियटला या वर्षाच्या सुरुवातीला जिभेवर वेदनादायक फोड आला होता. सुरुवातीला तिला वाटले की, हा अपस्माराच्या दौऱ्यादरम्यान जिभेला झालेल्या दुखापतीमुळे झाला असेल. मात्र, जेव्हा बायोप्सी झाली, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. स्क्वॅमस सेल कार्सिनोमासारखे गंभीर कर्करोग सामान्यतः वृद्धांमध्ये अधिक आढळतात. त्यामुळे 21 वर्षांच्या हॅरियटसाठी हे निदान मोठा धक्का देणारे होते. बायोप्सीनंतर एक महिन्याने तिला स्टेज टू स्क्वॅमस सेल कार्सिनोमा झाल्याचे निदान झाले आणि तातडीने उपचारांची तयारी सुरू झाली. हॅरियटची शस्त्रक्रिया अतिशय कठीण होती, ज्यात ॲडव्हान्स फ्री फ्लॅप टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला.
कर्करोगामुळे जिभेचा जो भाग काढावा लागला, तो पुन्हा तयार करणे हा या शस्त्रक्रियेचा उद्देश होता. हॅरियटने शस्त्रक्रियेबद्दल सांगितले, ‘डॉक्टरांनी माझी अर्धी जीभ काढली. त्यानंतर, त्यांनी माझ्या खांद्यावरील त्वचा आणि रक्तवाहिन्या घेऊन माझी जीभ पुन्हा तयार केली.’ याच सर्जरीमध्ये तिच्या खांद्यावर टॅटू असलेली त्वचादेखील जिभेवर हस्तांतरित झाली. जिभेवर आलेला टॅटू पाहून हॅरियटला धक्का बसला; पण तिला हसूदेखील आले. ती म्हणाली, ‘हे सर्व इतके अविश्वसनीय होते की, हा वेडेपणा पाहून मला हसू आवरले नाही.’ तथापि, ज्या ठिकाणाहून त्वचा काढली गेली, तो हाताचा भाग पाहून ती दुःखी झाली होती. तिच्यासाठी तो क्षण आनंद आणि वेदना यांचा मिलाफ होता.