

नैरोबी : ‘मृत’ घोषित केलेली व्यक्ती अंत्यसंस्कारावेळी उठून बसल्याच्या अनेक घटना आजपर्यंत देश-विदेशात घडलेल्या आहेत. मात्र असा प्रकार एखाद्याच्या आयुष्यात एक-दोनवेळा नव्हे तर तब्बल सहावेळा घडणे ही एक विशेष बाब ठरते. असाच एक माणूस आफ्रिकेत आहे, ज्याच्या आयुष्याची दोरी भलतीच बळकट आहे! त्यामुळे त्याला अनेक लोक ‘अमर व्यक्ती’ म्हणत असतात. हा माणूस एकदा नाही तर तब्बल 6 वेळा मृत घोषित केल्यानंतर शवागृहातून बाहेर आला आहे. या माणसाचे नाव आहे इस्माईल अजीजी. तो टांझानियाचा रहिवासी आहे.
अजीजी याचा पहिला ‘मृत्यू’ कामाच्या ठिकाणी गंभीर जखमी झाल्यावर झाला होता. डॉक्टरांनी त्याला उपचारादरम्यान मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबाच्या लोकांनी त्याला अंत्यविधीसाठी घेऊन जात असताना शवपेटी अचानक हलली. शवपेटी उघडताच अजीजी उठून बसला. हे पाहून लोक भयभीत झाले. दुसर्या मृत्यूची कहाणी अशी होती की, त्याला मलेरिया झाला होता. त्यात त्याची प्रकृती खूप खालावली होती. उपचारादरम्यान त्याचा ‘मृत्यू’ झाला आणि डॉक्टरांनी तसं घोषितही केलं.
आता पुन्हा त्याला शवपेटीतून घेऊन जात असताना त्याने डोळे उघडले. त्यानंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. दोनवेळा मृत्यूला हुलकावणी दिल्यानंतर त्याचा एक कार अपघात झाला, ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि तो कोमात गेला. पुन्हा त्याचा श्वास थांबला म्हणून डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असं कुटुंबीयांना सांगितलं. पण चमत्कार की आणखी काही वेळातच त्याने पुन्हा एकदा श्वास घ्यायला सुरुवात केली आणि तो जिवंत झाला. त्यानंतर एकदा त्याला सापाने दंश केला. ज्यात त्याचा ‘मृत्यू’ झाला व आता पुन्हा एकदा लोकांनी त्याला मृत समजून शवपेटीत ठेवले. पण यावेळी त्यांनी त्याला तीन दिवस शवपेटीत ठेवले.
तीन दिवस झाले, तरीही त्याने हालचाल केली नाही. म्हणून त्यांनी त्याला अंत्यविधीसाठी नेण्यासाठी तयारी सुरू केली. पण अचानक त्याने पुन्हा डोळे उघडले आणि तो शवपेटीतून बाहेर आला. आता मात्र गावकर्यांसह कुटुंबातील प्रत्येकजण भयभीत झाले होते. अजीजी हा साधा माणूस नाही असं त्यांना वाटायला लागलं. अजीजीने या सगळ्या गोष्टींना कंटाळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. यात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं खरं. पण काही वेळातच तो पुन्हा जिवंत झाला. आता लोकांच्या मनातील भीती अधिक वाढली.
अजीजी सामान्य माणूस नसून एक शैतान तर नाही असं त्यांना वाटू लागलं. सहाव्या वेळी तर सर्वांत भयानक घटना घडली. गावातील लोकांनी त्याला भूत समजून त्याचं घर जाळलं, ज्यात त्याचा सहाव्यांदा ‘मृत्यू’ झाला. घराची राखरांगोळी झाली तरीही यातून तो पुन्हा जिवंत बाहेर आला. आता मात्र लोकांची भीती अधिकच वाढली. गावकर्यांनी त्याला वाळीत टाकलं. मृत्यूवर मात करणारा हा अजीजी मात्र आज एकाकी जीवन जगत आहे. त्याच्यावर सैतान किंवा दुष्ट शक्तीचा वास आहे, असं गावकर्यांना वाटतं!