Suchindram Thanumalayan Temple |त्रिदेवांचा वास असलेले तामिळनाडूतील अनोखे मंदिर

Suchindram Thanumalayan Temple |
Suchindram Thanumalayan Temple |त्रिदेवांचा वास असलेले तामिळनाडूतील अनोखे मंदिर
Published on
Updated on

कन्याकुमारी : भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या सृष्टीच्या सृजन, पालन आणि संहार कार्याशी संबंधित एकाच परब्रह्माच्या तीन रूपांचे एकत्रित रूप होय. देशात अनेक दत्त मंदिरे पाहायला मिळतात जिथे अशी त्रिमुखी दत्तस्वरूपातील मूर्ती दिसते. मात्र, दक्षिण भारतात भगवान दत्तात्रेयांचे एक असे स्थान आहे, जिथे त्यांची त्रिमुखी मूर्ती नसून एकाच शिवलिंगात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा वास आहे. या मंदिराचे नाव ‘सुचिन्द्रम थानुमलयन मंदिर’ असे आहे. आपल्याकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगामध्येही अंगठ्याच्या आकाराची तीन लहान लिंगे आहेत. ही तीन लिंगे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) या त्रिदेवांचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे तसेच ‘त्र्यंबक’ म्हणजेच त्रिनेत्र असलेल्या शिवाच्या नावामुळेही या शिवलिंगाला ‘त्र्यंबकेश्वर’ म्हटले जाते.

शुचिंद्रम किंवा सुचिंद्रम येथील मंदिराच्या ‘थानुमलयन’ या नावामध्येच त्याचे रहस्य दडलेले आहे. यात ‘थानू’ म्हणजे शिव, ‘मल’ म्हणजे विष्णू आणि ‘अयन’ म्हणजे ब्रह्मा असा अर्थ होतो. त्रिदेवांचे हे एकत्रित रूप या मंदिराला संपूर्ण जगात अद्वितीय बनवते. या भव्य मंदिराच्या निर्मितीमध्ये इतिहासकाळातील तीन मोठ्या राजवंशांनी योगदान दिले आहे. हे मंदिर चोल, चेर आणि पांड्य राजांच्या काळात पूर्ण झाले. याच कारणामुळे या मंदिराच्या रचनेत केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या कला आणि वास्तुकलेचा एक सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यानंतर, १७ व्या शतकात त्रावणकोरच्या महाराजांनी या मंदिराची दुरुस्ती करून याला आधुनिक रूप दिले.

या मंदिरात असलेले आणि जगभर चर्चेचा विषय ठरलेले ‘संगीतमय खांब’ (Musical Pillars) कोणत्याही जोडतोडीशिवाय बनवले गेले आहेत. कारागिरांनी एकाच अखंड विशाल पाषाणाला कोरून हे खांब उभे केले आहेत, जे प्राचीन भारताच्या प्रगत इंजिनिअरिंगचे उत्तम उदाहरण आहे. याशिवाय, मंदिराकडे स्वतःचे तीन विशाल आणि देखणे रथ आहेत, जे उत्सवाच्या काळात काढले जातात. या पवित्र परिसरात एक मोठा आणि सुंदर तलाव आहे, ज्याला ‘पुष्करणी’ म्हटले जाते. या तलावाचे पाणी आजही अत्यंत स्वच्छ आणि पवित्र राखले जाते.

हे मंदिर हिंदू धर्मातील दोन मुख्य संप्रदाय शैव आणि वैष्णव यांना एका धाग्यात विणण्याचे काम करते. या चमत्कारी मंदिराचा इतिहास आणि पौराणिक कथा खूप जुन्या आहेत, ज्यांचा उल्लेख ‘स्कंद पुराणा’सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. मान्यतेनुसार, देवराज इंद्राला मिळालेल्या एका शापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी येऊन कठोर तपस्या केली होती व ते ‘शुचि’ म्हणजेच ‘शुध्द’ झाले होते. मंदिराच्या आवारात संकटमोचन हनुमानाची एक भव्य मूर्ती आहे. सुमारे १८ फूट उंच असलेली ही संपूर्ण मूर्ती एकाच विशाल खडकातून कोरलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news