

तेनकासी : तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यातील थिरुमलापूरम परिसरात उत्खननादरम्यान इतिहासाशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक आणि मौल्यवान पुरावा समोर आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या पथकाला येथे लोहयुगातील तब्बल 8 फूट लांब लोखंडी भाला सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील लोहयुगातील सापडलेले हे आतापर्यंतचे सर्वात लांब लोखंडी अवजार आहे.
यापूर्वी तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील सिवगालाई भागात लोहयुगातील सर्वात जुने पुरावे (सुमारे 3345 ईसापूर्व) सापडले होते. थिरुमलापूरम हे ठिकाण सिवगालाईपासून अवघ्या 80 किलोमीटरवर असल्याने हा शोध ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उत्खननाचे नेतृत्व करणारे के. वसंतकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे दोन भाले सापडले आहेत, ज्यापैकी एक 8 फूट तर दुसरा 6.5 फूट लांब आहे. हे दोन्ही भाले एका दफन कलशाजवळ ‘एक्स’ आकारात ठेवलेले होते. या कलशात सोन्याच्या काही वस्तूही सापडल्या आहेत. लांब भाल्याचे एक टोक गोलाकार आहे, ज्यावरून तो हातात धरण्यासाठी सोयीस्कर असावा, असा अंदाज लावला जात आहे.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका विभा त्रिपाठी यांच्या मते, हे भाले एखाद्या प्राचीन योद्ध्याचे असावेत, जो आपल्या पशुधनाचे आणि मालमत्तेचे रक्षण करत असे. डेक्कन कॉलेज पुणेचे माजी प्राध्यापक आर. के. मोहंती यांच्या मते, इतका लांब भाला दैनंदिन वापरासाठी नसून, एखाद्या शक्तिशाली किंवा उच्च पदस्थ व्यक्तीची ओळख किंवा अधिकार दर्शवण्यासाठी वापरला जात असावा. लोखंड वितळवण्यासाठी 1200 ते 1500 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. यावरून त्या काळातील तंत्रज्ञान किती प्रगत होते हे स्पष्ट होते. उत्तर भारताच्या तुलनेत तामिळनाडूच्या मातीमध्ये लोखंडाचे अवशेष चांगल्या स्थितीत सुरक्षित राहतात, ज्यामुळे हा संपूर्ण भाला सुस्थितीत मिळू शकला आहे.
तामिळनाडू पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक आर. शिवानंदम यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांत आयआयटी गांधीनगरच्या सहकार्याने राज्यातील विविध लोहयुगीन स्थळांचा अभ्यास केला जाईल. यामुळे त्या काळातील लोखंडी तंत्रज्ञानाचा विकास नेमका कसा झाला, हे समजण्यास मदत होईल.