

टोरांटो : कॅनडात ग्रेटर टोरांटो परिसरात उत्तर अमेरिका खंडातील भगवान शंकराची सर्वात उंच 54 फूट मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती ब्रॅम्प्टन येथील भवानी शंकर मंदिरात नुकतीच भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. प्रसिद्ध कलाकार नरेश कुमार कुमावत यांनी ही मूर्ती बनवली आहे.
ही 54 फूट उंच शिवप्रतिमा ब्रॅम्प्टनच्या भवानी शंकर मंदिरात हजारो भक्त आणि पर्यटकांच्या उपस्थितीत बसवण्यात आली. या रंगीत सोहळ्यात रथयात्रा आणि पारंपरिक पूजाअर्चा करण्यात आली. नरेश कुमार कुमावत यांना मूर्तीचे डिझाईन करून ती बनवण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागली. मूर्तीला आकर्षक रंग देण्यात आले असून यात एक मोठा त्रिशूलही आहे. मूर्तीच्या उंचीमुळे ती शहरातील अनेक भागांतून दिसते.
हे मंदिर ब्रॅम्प्टनच्या गजबजलेल्या भागात आहे, जिथे मिसिसॉगा आणि टोरंटोसारख्या जवळच्या शहरांमधून गाडीने सहज पोहोचता येते. भवानी शंकर मंदिर संघटना 2007 मध्ये स्थापन झाली. सध्याच्या मंदिराचे बांधकाम 2013 मध्ये सुरू होऊन 2016 मध्ये पूर्ण झाले. याशिवाय मिसिसॉगा येथे नुकतीच 51 फूट उंच भगवान श्रीरामांची प्रतिमाही स्थापित करण्यात आली आहे. ही रामप्रतिमा ऑगस्ट महिन्यात हिंदू हेरिटेज सेंटरमध्ये बसवण्यात आली, जिथे हजारो लोक उपस्थित होते. या सोहळ्याची माध्यमांमध्येही खूप चर्चा झाली. रामप्रतिमेचा काही भाग भारतात बनवण्यात आला होता आणि ती सुमारे चार वर्षांपूर्वी तिथे स्थापित केली गेली.