

वॉशिंग्टन ः तुम्ही आता हेडफोन्स किंवा इअरबडस्शिवाय संगीत किंवा पॉडकास्ट ऐकू शकता आणि आजूबाजूच्या कोणालाही त्रास न होता संभाषण करू शकता, असे नवे तंत्रज्ञान अमेरिकन संशोधकांनी विकसित केले आहे. पेन स्टेटमधील जियाक्सिन झोंग या संशोधकाने याबाबतची माहिती दिली आहे. या नव्या संशोधनात ‘ऑडिबल एन्क्लेव्ह्स‘ म्हणजेच विशिष्ट जागी मर्यादित राहणार्या ध्वनीच्या ‘खिश्यां’ची निर्मिती करण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे ध्वनी केवळ ठराविक ठिकाणीच ऐकू येईल, त्यामुळे मनोरंजन, संवाद आणि ध्वनीच्या वापरामध्ये मोठा बदल घडू शकतो.
ध्वनी हा हवेतील तरंगलहरींमधून प्रवास करतो. मात्र, या लहरींना पसरायची प्रवृत्ती (डिफ्रॅक्शन) असते. विशेषतः कमी फ्रिक्वेन्सीच्या ध्वनीलहरी अधिक विस्तारतात, त्यामुळे त्यांना मर्यादित जागेत रोखणे कठीण होते. विशिष्ट दिशेत ध्वनी पोहोचवण्यासाठी काही तंत्रज्ञान आधीपासून उपलब्ध आहे, जसे की पॅरामेट्रिक अॅरे स्पीकर. पण, ते संपूर्ण मार्गावर ऐकू येतात. नव्या संशोधनाने ‘स्वतः वाकणार्या अल्ट्रासाऊंड किरणां’चा वापर केला आहे. अल्ट्रासाऊंड हा 20kHz पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला ध्वनी आहे, जो माणसाला ऐकू येत नाही. त्यामुळे संशोधकांनी अल्ट्रासाऊंडला वाहक म्हणून वापरले, ज्यामुळे तो न ऐकू येता जागा पार करू शकतो आणि योग्य ठिकाणीच ऐकू येतो. संशोधकांनी दोन वेगळ्या फ्रिक्वेन्सीचे (उदा. 40kHz आणि 39.5kHz) अल्ट्रासाऊंड किरण वापरले. हे किरण जेव्हा एका विशिष्ट ठिकाणी जमतात, तेव्हा त्यांच्या परस्परसंयोगातून एका नव्या, ऐकू येणार्या फ्रिक्वेन्सीची निर्मिती होते. ही प्रक्रिया ‘डिफरन्स फ्रिक्वेन्सी जनरेशन‘ म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, आम्ही ‘अकौस्टिक मेटासरफेस’ नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, जे ध्वनीलहरींच्या प्रवासाचा मार्ग वाकवू शकते. यामुळे, अडथळ्यांच्या आजूबाजूने फिरणारा आणि विशिष्ट ठिकाणी एकत्र होणारा ध्वनी तयार करता येतो.
हेडफोन्सशिवाय खासगी ध्वनी अनुभव घेता येईल.
सार्वजनिक ठिकाणी देखील खासगी संभाषणे शक्य होतील.
केवळ इच्छित व्यक्तीलाच ध्वनी ऐकू जाईल, इतरांना त्रास
होणार नाही.
नवीन मनोरंजन आणि संप्रेषणाचे साधन उपलब्ध होऊ शकते.