

तैपेई : तैवानच्या नॅशनल पॅलेस म्युझियममध्ये अनेक मौल्यवान वस्तू प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. यात शाही मुकूट आणि अमूल्य रत्नांचाही समावेश आहे; पण या सर्वांमध्ये सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र मात्र एका साध्या पत्ताकोबीची मूर्ती आहे. पत्ताकोबीची ही मूर्ती जेडाइट नावाच्या दगडापासून अत्यंत बारकाईने कोरलेली आहे. ही मूर्ती बनवणाऱ्या कलाकाराने दगडाच्या नैसर्गिक रेषा आणि त्यातील त्रुटींचा इतका उत्तम वापर केला आहे की, ती हुबेहूब खऱ्या पत्ताकोबीसारखी दिसते.
असे सांगितले जाते की, पत्ताकोबीची ही मूर्ती 1880 च्या दशकात गुआंगक्सू समाटाच्या पत्नीला माहेरची भेट म्हणून देण्यात आली होती. पत्ताकोबीला पवित्रता, प्रजनन क्षमता आणि समृद्धीशी जोडले जाते. त्यामुळे ही कलाकृती लोकांसाठी आणखी महत्त्वाचे स्थान ठेवते. कला तज्ज्ञांच्या मते, ही मूर्ती केवळ प्रतीकात्मकतेमुळेच नव्हे, तर तिच्या उत्कृष्ट जेडाइट रंगांमुळे आणि उत्कृष्ट शिल्पकलेमुळे देखील प्रसिद्ध आहे. आजच्या काळात ही कलाकृती तैवानची सांस्कृतिक ओळख बनली आहे. ही मूर्ती इतकी प्रसिद्ध आहे की लोक तिच्या चित्रांशी मिळतीजुळती खेळणी देखील बनवतात. जगभरातील लोक या मूर्तीला पाहण्यासाठी खास म्युझियममध्ये येतात.