Baby Stone | गर्भातच 'दगड' बनले बाळ!

तीन वर्षे पोटात बेबी स्‍टोन बाळगणाऱ्या महिलेवर शस्त्रक्रिया
Baby Stone |
Baby Stone | गर्भातच 'दगड' बनले बाळ!
Published on: 
Updated on: 

सोमालीलैंड : वैद्यकीय जगताला थक्क करणारी आणि अंगावर काटा आणणारी एक अत्यंत दुर्मीळ घटना समोर आली आहे. पूर्व आफ्रिकेतील सोमालीलैंड येथे एका ४२ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल ३ वर्षांनंतर 'दगडासारखा कडक झालेला मृत गर्भ' (स्‍टोन बेबी) यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आला आहे. गेल्या ३ वर्षांपासून ही महिला पोटातील तीव्र वेदना आणि जडपणाने त्रस्त होती.

'इंटरनॅशनल मेडिकल केस रिपोर्ट्‌स जर्नल' आणि 'लाइव्ह सायन्स'ने दिलेल्या अहवालानुसार, डॉक्टरांनी जेव्हा अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन केले, तेव्हा पोटातील दृश्य पाहून तेही चक्रावून गेले. डॉक्टरांच्या मते, या अत्यंत दुर्मीळ वैद्यकीय स्थितीला 'लिथोपेडियन' किंवा 'स्टोन बेबी' असे म्हटले जाते. गर्भाशयाऐवजी पोटाच्या पोकळीत गर्भ विकसित होतो आणि त्याचा मृत्यू झाल्यास ही स्थिती उद्‌भवू शकते. गर्भाचा आकार मोठा असल्याने शरीराला त्याचे पूर्णपणे शोषण करता येत नाही. अशावेळी शरीराचा संसर्ग (इन्‍फेक्‍शन) टाळण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मृत गर्भाच्या आजूबाजूला कॅल्शियमचा थर जमा करण्यास सुरुवात करते. काळानुरूप हा संपूर्ण गर्भ दगडासारखा कडक बनतो.

४०० वर्षांतील केवळ ३४० प्रकरणांची नोंद

वैद्यकीय इतिहासात गेल्या ४०० वर्षांत जगभरात अशाप्रकारची फक्त ३३० ते ३४० प्रकरणेच नोंदवली गेली आहेत. सोमालीलैंड येथील डॉक्टरांनी वेळेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून या महिलेच्या पोटातून तो दगड झालेला गर्भ सुरक्षितपणे बाहेर काढला. शस्त्रक्रियेनंतर ६ महिन्यांनी तपासणी केली असता महिला पूर्णपणे स्वस्थ झाली असून तिची वेदना कायमची निघून गेली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण किंवा मागासलेल्या भागांत गरोदरपणाच्या काळात वेळेवर सोनोग्राफी, तपासणी आणि वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे अशा गंभीर आणि दुर्मीळ केस वेळेवर समोर येत नाहीत. वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास अशा धोकादायक स्थिती टाळता येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.