Ghost Bicycle | आता आली अफलातून ‘घोस्ट बायसिकल’!

Ghost Bicycle |
Ghost Bicycle | आता आली अफलातून ‘घोस्ट बायसिकल’!
Published on
Updated on

अहमदाबाद : गुजरातच्या सुरतमधील एका तरुणाने इंजिनिअरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आपल्या कल्पनाशक्तीने तयार केलेली ‘घोस्ट बायसिकल’ पाहून सध्या अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. शिवम मौर्य याला सोशल मीडियावर ‘क्रिएटिव्ह सायन्स’ या यूट्यूब चॅनलमुळे ओळखले जाते. त्याने रस्त्यावर विनाचालक धावणारी सायकल तयार केली आहे, जी ‘घोस्ट बायसिकल’ म्हणून प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर या सायकलचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सायकलवर जणू काही फक्त पाय असलेली व्यक्ती बसून ती चालवत असल्याचा भास होत आहे. शरीराचा पोटापासून वरचा भाग नसल्याने एखादे भूत ही सायकल चालवत असल्याचे पाहताना वाटते!

शहरातील रस्त्यावर या सायकलची चाचणी घेतली असता, सायकल पाहणारे आश्चर्यचकित झाले होते. लहान मुलांना एकीकडे नेमकी ही सायकल कशी धावतीये याची उत्सुकता होती, तर दुसरीकडे भीती वाटत होती. माणूस स्वार नसतानाही पेडल फिरताना पाहून एखाद्या चित्रपटातील द़ृश्य पाहत असल्याचे वाटत होते. ‘एआय’च्या साहाय्याने बनवण्यात आलेल्या या सायकलसाठी शिवम मौर्य हा त्याचा सहकारी गुरप्रीत अरोरासह सलग तीन महिने काम करत होता. ही सायकल बनवण्यासाठी त्यांना 35 हजारांचा खर्च आला; पण हा प्रोजेक्ट फक्त ‘व्हायरल’ झालेला देखावा नसून, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रातील एक गंभीर प्रयोग आहे.

शिवमने दिलेल्या माहितीनुसार, सायकलमध्ये सेन्सर, सर्किटस् आणि बॅलेन्स साधण्यासाठी तसेच मानवी मदतीशिवाय पूर्वनिर्धारित मार्गाचे अनुसरण करणे यासाठी ‘एआय’आधारित मॅपिंगचा वापर करण्यात आला आहे. ‘आम्हाला असे काही बनवायचे होते, ज्यामुळे इंजिनिअरिंग आणि कल्पकता यांचा संगम होईल. हा प्रकल्प हे दर्शवतो की, सुलभ तंत्रज्ञान कशा प्रकारे भविष्यवेधी उपाय निर्माण करू शकते.’ ही ‘घोस्ट बायसिकल’ म्हणून प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे, एखाद्या व्यक्तीला फक्त पाय आहेत आणि त्याच्या आधारे सायकल चालवत आहे, असा भास निर्माण होतो. यामध्ये मानवी पायांसारखी दिसणारी एक रचना बसवली आहे, जी सायकल पुढे जाताना नैसर्गिकरीत्या पॅडल मारते.

या वैशिष्ट्यामुळे असा भास होतो की, कोणीतरी अद़ृश्य व्यक्ती ती चालवत आहे आणि म्हणूनच सोशल मीडिया यूजर्सनी ‘घोस्ट बायसिकल’ असे नाव दिले आहे. ही सायकल तीन वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रित केली जाऊ शकते. यूजर्स स्मार्टफोन अ‍ॅप, रिमोट किंवा ऑटोमॅटिक मोडच्या माध्यमातून ती चालवू शकतात. आधीच ठरवलेल्या मार्गाने ती सायकल तुम्ही चालवू शकाल. सेन्सॉरच्या साहाय्याने रस्त्यात येणारे अडथळे, समतोल आणि सुरक्षितपणे वळण घेणे यास मदत होते. शिवम मौर्य हे नाव डिजिटल क्षेत्रात आधीच ओळखीचे आहे. त्याच्या ‘क्रिएटिव्ह सायन्स’ या यूट्यूब चॅनलचे 20 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. येथे ते नियमितपणे तंत्रज्ञानाशी संबंधित असणार्‍या प्रयोगाचे व्हिडीओ टाकत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news